शाळेत असताना सहावीला जे मराठी शिकवायला शिक्षक वर्गावर आले होते, त्यांची दोन दैवते होती. एक होते प्र. के. अत्रे. वर्गात मराठी शिकवता शिकवता मधेच ते अत्र्यांचा विषय काढायचे. त्या विषयावर ते कुठूनही पोचत असत. म्हणजे, ‘हस्ताक्षर नेहमी सुंदर असायला हवे’ असे म्हणून झाले की ते लगेच म्हणत, ‘‘तुम्ही मुलांनी अत्र्यांची स्वाक्षरी पाहायला हवी. अशी झोकदार स्वाक्षरी!’’ मग हवेत हात फिरवून ते मोठय़ा झोकदार अक्षरात ‘प्र. के. अत्रे’ अशी अदृश्य अक्षरे काढीत आणि मग पुन्हा शिकवायच्या मूळ विषयाकडे येत. कधी मधेच ते अत्र्यांच्या पत्रकारितेवर बोलत, कधी ते अत्रे चित्रपटकार कसे होते त्यावर बोलत. कधी ते अत्र्यांच्या निर्भीड, पण काही वेळा उद्धट वाटणाऱ्या शब्दसंपदेवर बोलत. अत्र्यांनी यांना कसे झाडले, त्यांना कसे तोंडघशी पाडले, वगैरे..

त्यांचे दुसरे दैवत होते- शांतारामबापू. बापूंचे खरे नाव आम्हाला फार उशिरा कळले. कारण आमचे शिक्षक त्यांना ‘बापू’ म्हणून एकदम नेहमी घरगुतीच करून टाकीत असत. ‘पिंजरा’ या विषयावर ते अनेकदा बोलत. वास्तविक पाहता शाळेतल्या मुलांसमोर बोलायचा तो विषय नव्हे. पण हे शिक्षक नेहमी त्यावरच बोलत. ते सांगत की, ‘‘बापू किती हुशार दिग्दर्शक होते हे पाहा. चित्रपट सुरू होतो तेव्हा आपल्याला डॉक्टरांच्या (पुण्यात श्रीराम लागूंना नुसते डॉक्टर असेच म्हणतात. डॉक्टरांकडे गेलो होतो म्हणजे लागूंकडे गेलो होतो. डॉक्टर रागावले म्हणजे लागू रागावले. डॉक्टरांच्या हस्ते म्हणजे लागूंच्या हस्ते!).. तर सिनेमा सुरू होतो तेव्हा आपल्याला डॉक्टरांच्या खोलीत ‘ब्रह्मचर्य हेच जीवन’ अशी पाटी दिसते. डॉक्टर असतात शिक्षक. आणि जेव्हा नायकीण डॉक्टरांना जवळ घेते तेव्हा डॉक्टरांचा पाय ‘ब्रह्मचर्य’ या शब्दावर पडतो. ब्रह्मचर्य झाकले जाते आणि उरते ते काय? मुलांनो उरते ते काय? (कीर्तनकाराच्या आवेशात) ‘हेच जीवन’! याला म्हणतात दिग्दर्शन. यालाच म्हणतात उत्तम दिग्दर्शन! नायकिणीचा पाश डॉक्टरांवर पडतो हे दाखवायला बापूंनी किती सुंदर मार्ग वापरला. याला म्हणतात उत्तम दिग्दर्शक.’’

Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

हे ऐकून ऐकून माझी समजूत- दिग्दर्शक हा कसा असायला हवा? तर- तो विविध पाटय़ा खुबीने दाखवत किंवा लपवत लोकांना चोरून संदेश देणारा किंवा पात्रांच्या आयुष्यात पुढे घडणारा धोका आपल्याला आधीच दाखवणारा असायला हवा- अशी झाली होती. ‘दिग्दर्शक’ हा शब्द मी त्याआधी कधी ऐकला नव्हता. कारण आम्ही लहानपणी सनी, जॅकी, ऋषी आणि अनिलचे सिनेमे पाहत असू. त्याला कोण दिग्दर्शक आहेत, हे आम्हाला कधीच माहीत नसे. त्यानंतर दोन बायका आल्या. श्रीदेवी आणि माधुरी. त्यांचे सिनेमे हे त्यांच्या नावावर चालत; दिग्दर्शकाच्या नाही. त्यामुळे ‘ब्रह्मचर्य’ ही पाटी झाकण्यापलीकडे दिग्दर्शकाचे पुढील काम काय, याची कल्पना यायची काही सोय नव्हती.

आमच्या घरी दर शनिवारी थेटरात जाऊन हिंदी सिनेमे बघायचा रिवाज होता. माझे आजोबा म्हणत की, एक वेळ उपाशी राहा, पण हिंदी सिनेमा चुकवू नका. त्याने माणसाला जगायला बळ येते. नाटके वगरे पाहण्यावर आमच्याकडे कुणाचाच अजिबात विश्वास नव्हता. कारण नाटकातले नट सारखे आपल्या आजूबाजूला प्रत्यक्ष दिसतात. पुण्यात तर फारच! पण सिनेमाचा नट कधीही आपल्याला दिसत नाही, म्हणूनच त्याला पाहायला आपण आवर्जून जातो. त्यामुळे शनिवारी सकाळची शाळा झाली की आईसोबत आम्ही सगळे हिंदी सिनेमाला जात असू. मग रविवारी बाबांसोबत इंग्रजी सिनेमे पाहावे लागत. कारण त्यांच्या मते, हिंदी सिनेमा अगदीच बेकार होता. खरा सिनेमा पाहायचा तो हॉलीवूडचा. काय ती भव्य स्केल! काय ते सुंदर विषय! उगाच फालतू प्रेमाची गाणी गात फिरणे नाही.. असे ते म्हणत. आम्हाला काय? हिंदी असो वा इंग्रजी; दोन्हीकडे हळद-मीठ लावलेले पॉपकॉर्न आणि थंडगार गोल्डस्पॉट असे. जिथे न्यायचे तिथे न्या!

एकदा ‘अमर अकबर अंथोनी’ हा चित्रपट आई आणि मावशीसोबत पाहत असताना त्यातला रक्तदानाचा सुप्रसिद्ध सीन बघताना माझी मावशी एकदम कळवळून पदर डोळ्याला लावून म्हणाली, ‘काय तरी बाई सुंदर डायरेक्शन आहे.’ तीन मुलांचे रक्त एकाच वेळी आईकडे चालले होते. आई आणि मावशी एकत्र रडत होत्या. मी आईला विचारले, डायरेक्शन म्हणजे काय गं? आई म्हणाली, ‘नंतर सांगते, आत्ता गपचूप सिनेमा बघ.’ पण मग ते सांगायचे राहूनच गेले.

रात्री व्हीसीआर भाडय़ाने आणून सलग तीन सिनेमे पाहण्याचा उद्योग करायची तेव्हा कौटुंबिक चाल होती. एकदा आम्हा मुलांना भरपूर जेवूखाऊ  घालून पहिला गोविंदाचा कोणतातरी सिनेमा लावून सगळे पाहत बसले. हळूहळू मुले झोपू लागली. रात्री मला पाणी प्यायला जाग आली तेव्हा सगळी मुले झोपली होती आणि सगळ्या मावश्या, माम्या, मामे हे ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट पाहण्यात दंग होते. मी तसाच पडून राहून एक डोळा उघडा ठेवून बराच चित्रपट पाहिला आणि मग मी पाणी प्यायला अचानक उठलो तेव्हा मला धाकटय़ा मावशीने दटावून परत झोपवले. पाणी प्यायलासुद्धा उठू दिले नाही. त्यात भलतेच डायरेक्शन होते, असे आई म्हणाली, तुम्हा मुलांसाठी तो सिनेमा नाही.

‘सिलसिला’ पाहून माझ्या बहिणी म्हणाल्या की, रेखा फारच सुंदर दिसते, पण डायरेक्शन चांगले नाही. कारण जया फार रडकी आहे आणि तिच्या साडय़ा फार वाईट आहेत. आणि आपण दोघींपैकी कुणाची बाजू घ्यायची, तेच मुळी कळत नाही. कधी हिचे पटते, तर कधी तिचे! डायरेक्शनमध्ये आपल्यालाच ठरवायला लावले आहे. अरे बापरे! म्हणजे डायरेक्शन करताना प्रेक्षकांना ठरवायला लावले की डायरेक्शन वाईट होते, असे माझ्या बहिणी मला सांगत होत्या.

यावरून मला हळूहळू लक्षात आले, की डायरेक्शन हे विविध प्रकारचे असते. मुलांचे, मोठय़ांचे, कार्टूनचे, युद्धाचे. आणि डायरेक्शन चांगले असले की सिनेमा चांगला असतो आणि डायरेक्शन चांगले नसले की सिनेमा चांगला नसतो. एकदा आई-बाबा आम्हाला लहान मुलांचे घोडय़ाचे गाणे असलेला ‘मासूम’ हा सिनेमा पाहायला घेऊन गेले होते. त्यात शबाना आझमी त्या लहानग्या पोराशी इतकी वाईट वागत होती, की मला तिचा फार राग राग आला. घोडय़ाचे गाणे संपल्यावर मी थेटरात झोपून गेलो. तो बिचारा ‘नसिरुद्द्धीन शा’ तिचे सगळे मुकाट ऐकून घेत होता. मला ते डायरेक्शन मुळीच आवडले नाही. ते घोडय़ाचे सुंदर गाणे सुरू असताना ती बया अचानक कुठूनशी येईल आणि त्या मुलाला मारेल अशी भीती मला वाटत राहिली. अशी आई कुठे असते काय? मी दुसऱ्या दिवशी आईशी वाद घालत होतो. पण तिला तो सिनेमा इतका आवडला होता, की काही विचारायची सोय नाही. ‘मी खमकी होते म्हणून या घरात टिकले, नाहीतर सगळीकडचे पुरुष सारखेच. एखादी असती तर कधीच हे घर सोडून गेली असती..’ असे काहीतरी रागाने पुटपुटत ती स्वयंपाक करीत होती. म्हणजे डायरेक्शन एकाला आवडते आणि दुसऱ्याला नाही- असेपण होत होते तर.

आणि अचानक एक वेगळीच गोष्ट घडली. आमच्या नात्यातील किशोरीमावशींच्या आशुतोषने एक सिनेमा डायरेक्ट करायला घेतला आहे अशी बातमी मला आईने दिली. मी नववीत होतो. मला फार थरारून गेल्यासारखे झाले. म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेले कुणीतरी डायरेक्शन करणार आहे याचा मला फार आनंद झाला. त्या सिनेमाचे नाव होते ‘पेहला नशा’! मी त्या सिनेमाची खूप वाट पाहू लागलो. कारण तोपर्यंत मी डायरेक्टर नावाच्या माणसाला पाहिलेच नव्हते. आणि आता मी ज्याला अनेक वेळा भेटलो होतो तो आशुतोष चक्क डायरेक्टर होणार होता याचे मला फार थ्रिल वाटले.

आशुतोष एक सिनेमा डायरेक्ट करून थांबला नाही. मग त्याने ‘बाझी’ नावाचा दुसरा सिनेमा लगेचच डायरेक्ट करायला घेतला. तेव्हा मी दहावीत होतो आणि मला फार अस्वस्थ वाटत होते. मलापण मुंबईला जाऊन त्या कामात उडी मारायची होती. तो काय काम करतो ते पाहायचे होते. का ते माहीत नाही, मला त्यावेळी नक्की काय करायचे आहे याचा गोंधळ मनात नव्हताच. मला सिनेमातच जायचे होते. दहावीची बोर्डाची परीक्षा संपली आणि दुसऱ्या दिवशी सुटीला काकांकडे जातो असे सांगून मी एकटा मुंबईला गेलो. रिक्षाने आशुतोषने बोलावलेल्या जागी गेलो. बांद्रय़ातील एका जुन्या प्रशस्त बंगल्यात त्याचे संकलनाचे काम चालू होते. तो बाहेर आला तेव्हा मी त्याला विचारले, की माझी शाळा आता संपली आहे तर मी तुझ्यासोबत काम करू का? त्याने मला शांत ताकीद दिली, की घरी परत जायचे आणि पहिलं शिक्षण पूर्ण करायचे. तू लहान आहेस. आत्ता इथे यायचे नाही. कॉलेज संपले कीमग आपण बघू. हा विचार आत्ता डोक्यातून काढून टाक. फक्त पंधरा वर्षांचा आहेस तू. मी त्याचे ऐकून मुकाटय़ाने पुण्यात परत फिरून आलो.

(क्रमश:)

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com