एकोणीसशे अठ्ठय़ाऐशीमधला आठ मार्च, पांडवनगर सव्‍‌र्हे नं. २६१ च्या दृष्टीनं आणि आमच्या संघटनेसाठीही एक विलक्षण कलाटणी देणारा ठरला. शहरीकरणाच्या वाटचालीत माणसांनी कब्जात घेतलेल्या ‘जमीन’ या नसíगक घटकाचं एक विस्मयकारक आव्हान आमच्या समोर प्रकटलं! त्यानिमित्ताने दादागिरी विश्व विद्यापीठाशी माझी ओळख झाली ती कायमचीच!

त्या दिवशीच्या मोर्चाला आणि सभेत तिथल्या मोलकरीण स्त्रियांची संख्या तर मोठी होतीच. पण त्यामुळे मोर्चात आणि नंतरच्या सभेतही सर्वात पुढे त्याच होत्या. जणू कार्यक्रमाच्या त्या नेतृत्वात होत्या. दुसऱ्या दिवशी, ती बातमी बऱ्याच वर्तमानपत्रांच्या पहिल्याच पानावर झळकली. वर्तमानपत्रातल्या फोटोंमधले त्यांचे चेहरे अगदी स्पष्ट ओळखायला येत होते. केवळ कौतुकाची वाटावी अशी ही गोष्ट या स्त्रियांसाठी मात्र सरळ, साधी राहिली नाही. फोटोमुळे वस्तीतल्या दबावाच्या परिस्थितीनं संघर्षांचं हिंसक रूप धारण केलं. ती अख्खी वस्तीच एका संघर्षांच्या भूमीत रूपांतरित झाली.

‘‘.. कुठे जातात आणि काय करतात, बघतोच आता एकेकीकडे.’’ नऊ मार्चचं वर्तमानपत्र हातात नाचवत गुंजाळ अक्कांनी जाहीर केलं. सकाळची थोडीफार असणारी शांतता त्या आवाजानं थरारून गेली. त्यांच्या दहशतीची अंमलबजावणीही नक्की होणार आहे हा ‘मेसेज’ सर्वत्र क्षणांत पोचला. ‘हमसे जो टकराये गा मिट्टी में मिल जायेगा..’ कालच्या घोषणा देणारे जागतिक महिला दिनातले उत्साही आवाज काही वेळासाठी जणू मुके होऊन गेले. संघटनेच्या आमच्यासारख्या बाहेरच्या कार्यकर्त्यांना कळवता येईल अशीही सोय त्यांच्याकडे नव्हतीच.

तशी, पांडवनगर रहिवाशांना शिवीगाळ नवी नव्हतीच. म्हणजे पूर्वीसुद्धा बाटलीवाला ऊर्फ घाग यानं प्रयत्न केले होते, वस्तीतल्या लोकांना जगण्यासाठी निदान पाणी आणि नसíगक विधीसाठी संडास मिळवण्यासाठी. त्याला अर्धमेला होईपर्यंत गुंजाळ मंडळी मारत होती आणि अख्खी वस्ती चिडीचूप धगधगत्या अंत:करणानं, आपापल्या पत्र्यांच्या घरांची टिनपाट दारं लोटून घेऊन ते सर्व अनुभवत होती. पोलीस चौकीच काय पण साधा ‘ब्र’ देखील काढायची तेव्हा कोणाला हिंमत नव्हती. पण त्या सकाळी तसं नव्हतं. मोठय़ा संख्येने मोर्चात आलेल्या स्त्रियांच्या कंठातल्या घोषणा मुक्या होत्या तरी डोक्यात जिवंतच होत्या..

अगदी अल्पकाळातच गुंजाळांचा प्रत्येक हल्ला निर्धारानं परतवून लावण्यासाठी तिथल्या स्त्रिया निर्धारानं उभ्या राहिल्या. प्रचंड दबावाला झिडकारायचं कसं याचं जणू ‘नवनीतच’ त्यांनी तयार केलं. पुढे दीड र्वष त्या तटून राहिल्या. आपल्या घरातले दारूडे पुरुष, या दहशत-दादांच्या अड्डय़ावर जाणार, आपल्या आखलेल्या पुढच्या धोरणांना मातीत घालणार, याबद्दलही त्यांचा अंदाज पक्का असायचा. म्हणूनच लढय़ाच्या अगदी अखेरच्या टप्प्यातसुद्धा घरातल्या पुरुषांना पुढच्या गोष्टींचा थांगपत्ता त्यांनी लागू दिला नाही. अखेरीस वस्ती अधिकृत झोपडपट्टी म्हणून घोषित झाली.

संघटना या नात्यानं ते आव्हान आमच्यासमोरही होतंच. अर्थात संघटनेचं नेतृत्व स्वातंत्र्य चळवळीत ऐन तारुण्यात झोकून देऊन काम करणाऱ्या कॉ. लीलाताई भोसले करत होत्या तर वेळोवेळी स्वातंत्र्यसनिक आणि कामगार नेते कॉ. अप्पासाहेब भोसलेही मार्गदर्शनाला होते. वास्तविक मोलकरीण स्त्रियांची संघटना स्थापन झाली १९८० मध्ये, ती त्यांच्याच उत्स्फूर्त मोर्चामुळे. हळूहळू मोलकरीण स्त्रिया संघटित झाल्या. ‘पुणे शहर मोलकरीण संघटना’ स्थापन झाली. सातत्यानं भागाभागातल्या मोलकरणी स्त्रियांच्या सभा बठका सुरू झाल्या. त्या बैठकांना पांडवनगरमधल्या स्त्रियाही येत होत्या.

अनेक वस्त्यांनी जमा होणाऱ्या त्या सगळ्याजणी मोलानं काम करणाऱ्या ‘मोलकरणी’ होत्या. ‘घरकामाचं’ मोल हा प्रश्न तसा गुंतागुंतीचा होता. शिवाय त्यांच्या ‘मालकिणी’ म्हणजे आमच्यासारख्याच मध्यम-उच्च मध्यम वर्गातल्या स्त्रिया! स्त्रियांच्या चळवळीकडे आकर्षति झालेल्या. स्वत:च्या हक्कांबाबत तशा जागरूक असणाऱ्या. स्वत: नोकरदार. बँक, एल.आय.सी. शासकीय वा प्राध्यापिका अशा. घरी कामाला लावलेल्या मोलकरणीचा पगार किंवा मोल ठरवणं हा या ‘मालकिणींच्या’ दृष्टीनं तसा खासगी प्रश्न होता. म्हणूनच तो प्रश्न नेटकेपणानं स्पष्ट करणं आवश्यक होतं. पण या सभांना येणाऱ्या पांडवनगरमधल्या स्त्रियांनी वेगळीच कलाटणी दिली. त्या म्हणायला लागल्या, आम्ही आमच्या मालकिणींशी सहज बोलू. थोडा पगारही वाढवून घेऊ, तो काही मोठा प्रश्न नाही. पण आमच्यासाठी आपण सगळ्यांनी सरकारकडे घरं मागितली पाहिजेत.

तो काळ म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी, चौऱ्याऐंशी. देश स्वतंत्र होऊन चौथं दशक सुरू झालेलं होतं. त्या त्यांचा जीवनपट वारंवार मांडत होत्या. कहाण्या सांगत होत्या. दमून भागून घरी यावं, तर अख्खी वस्ती अंधारात बुडलेली. जवळच दारूच्या भट्टय़ा पेटलेल्या. दोन हंडे पाणी आणायला पुन्हा वणवण. कोणाशी काही बोलायची सोय नाही. ‘भाडे दे’चा आदेश आला की दे. नाही दिलं तर लगेचच भांडंकुंडं रस्त्यात भिरकावलं जातं. लक्ष्मीबाई ढोणे यांनी एकदा भाडं द्यायला जरा थांबा म्हंटलं तर त्यांचं तान्हं मूलच या घरमालकिणीनं खेचून भिरकावून दिलं होतं. ‘भावाच्या घरात राहातोस कसा’ असं म्हणून रात्री भर पावसात नवीन लग्न होऊन आलेल्या शिवाजी आणि त्याच्या बायकोला याच गुंजाळदादांनी घराबाहेर काढलेला. अनेक धक्कादायक कथा. या सगळ्यावर इलाज म्हणून पांडवनगरच्या बाया म्हणत होत्या, की सरकारानं मोलकरीण बायांना स्वतंत्र घरं बांधून द्यावीत. तशी त्यांची मागणी योग्यही होती. सरकार जरी आपलंच होतं तरी सर्वसामान्यांच्या कित्येक रास्त मागण्यांचीही सोडवणूक होत नव्हती. त्यातून या तर अगदीच कधी नोंद, दखल न घेतलेल्या. एवढंच नाही खुद्द देश स्वतंत्र होण्यासाठी लढलेल्या, समाजवादी, गांधीवादी, कम्युनिस्ट सगळ्या छटांच्या स्वातंत्र्य सनिकांना एक प्रश्न सतावत होता की आपण स्वातंत्र्याचं कोणतं स्वप्न बघून आयुष्याचा होम केला? एकीकडे विकासाचा रथ चांगलाच सज्ज झाला होता. पुण्यासारखं शहर तर पार बदलायला लागलं होतं. जुने वाडे पाडून तिथे अपार्टमेंट करणं तर रोजची बाब व्हायला लागली होती. शिवाय आसपासच्या ग्रामीण भागाच्या शेतजमिनींवरचा हरितपट्टा जाऊन तो रहिवासी झोन होत होता. नव्यानव्या घरकुल योजना जन्माला येत होत्या. हे सगळं बाजारपेठेच्या चक्राभोवतालचं होतं. त्यात या स्त्रियांची आम्हाला घरं द्या ही मागणी, खोटं आश्वासन देऊ म्हंटलं तरी जिभेला लुळं करणारीच होती. आता प्रश्न होता, त्यांना सर्वार्थानं मदत करण्याचा. आमच्याकडे एकच मंत्र होता त्यांना देण्यासाठी, हिंमत न हारता संघटित व्हा. नवा मार्ग शोधू या. महत्त्वाचा मुद्दा होता तो वस्तीत दहशत करणाऱ्या गुंजाळ मंडळींना कोणता अधिकार आहे ते शोधण्याचा.

गुंजाळ मंडळींचा मुख्य आधार होता तो अर्थातच त्या २ एकर ६४ गुंठय़ाच्या कातळवजा डोंगरावर त्यांनी बांधलेल्या घरांच्या मालकी हक्काचा. फग्र्युसन महाविद्यालयाच्या मागच्या कंपांऊडलगतचा भाग. तिथली माती थोडी दूर केली तर लक्षात आलं की १८७९ मध्ये जत संस्थाननं वृद्धेश्वर पाचपांडव मंदिर देवस्थान यांना ही जमीन इनाम म्हणून दिलेली. देश स्वंतत्र झाल्यावर मायबाप सरकारकडे जमा झालेली. अर्थातच देवस्थान ट्रस्ट जागृत होतं. त्यांनी हा वाद खुद्द मायबाप सरकारच्या विरोधात कोर्टात नेलेला. पण गुंजाळ तिथे आले कुठून? ते कोण होते? गुंजाळ मंडळीही तशी पिढय़ान्पिढय़ा राबणाऱ्यांच्या रक्तातूनच आकाराला आलेली. म्हटलं तर दुर्लक्षित. कोणी दगड फोडणारी कोणी माती वाहणारी. पुण्यनगरीतल्या कितीतरी सनातन दगडी इमारती उभ्या करण्यात ज्यांच्या मागच्या अज्ञात पिढय़ांनी घाम गाळलेला तो त्यांच्याच जाती जमाती-जमातींनी. पण आता पुण्याच्या जुन्या इतिहासाला खूपच नवं वळणं मिळालेलं होतं. कोणा सरदार, चिटणीस-राजदरबारी यांना इनामाखातर मिळालेल्या ऐतिहासिक वास्तूंना एक तर जमिनीच्या स्वाधीन करून त्यावर नव्याच इमारती बांधणं किंवा आहे त्या इतिहासाला जागतं ठेवण्यासाठी जुन्या वेशात वेटर वगरे ठेवून तिथे पंचतारांकित हॉटेल करण्याचा काळ आकाराला येत होता. दगड-मातीत श्रम ओतणाऱ्यातील गुंजाळांसारखी मंडळी हे बघतच होती की.

एकेकाळी निर्मनुष्य असणाऱ्या फग्र्युसनच्या मागच्या डोंगरांवर त्यांच्या दारूच्या भट्टय़ा पेटत होत्या.  तिथे गिऱ्हाइकं येणारच आणि तेही वाढत्या संख्येनं. असेच कोणी कोणी अडले नडले त्यांना विचारू लागले इथे राहता येईल का? आणि तिथल्या दोन-चार गुंजाळांना जीवनाचं नवंच सूत्र सापडलं. वासे पत्रे आणून पत्र्याची खोली बांधणं म्हणजे तर त्यांचा तसाही हातचा मळच होता. खोल्या तयार होऊ लागल्या. भाडेकरूही यायला लागले. कोण होते हे भाडेकरू? या नव्या भाडेकरूंशी आमची ओळख झाली तेव्हा तिथे साडेतीनशे ‘झोपडय़ा’ किंवा ‘घरं’ उभारली गेलेली होती. या साडेतीनशेमधल्या बहुसंख्य होत्या त्या या मोलकरणी. त्या मोलकरणी झाल्या.

आम्ही सभा घेत होतो. आम्ही गाणी म्हणत होतो.. ‘बाई मी धरणं धरणं बांधिते, माझं मरण मरण कांडिते’ किंवा ‘पाणी कुठंवर आलं गं बाई? पाणी कुठवर आलं गं बाई? सांगू चला सरकारला आता नाही आम्ही अबला’ आणि त्या मोलकरणी आमच्या सुरात सूर मिसळत होत्या. त्याही होत्या कोणी धरणग्रस्त, कोणी दुष्काळग्रस्त कोणी शेतीग्रस्त. आमच्याकडे मोठय़ा अपेक्षेनं बघत होत्या. आता त्यांच्या अडचणी सोडवायचा जणू त्यांना काही तरी मार्ग सापडणार होता. त्या सांगायच्या.. ‘बाई ही कसली झोपडी? ही तर कोंबडीची खुराडी. आमच्या गावची झोपडी ती खरी झोपडी. पुढं निदान सारवायला अंगण आणि मागच्या दाराला पाण्याला विहीर. इथं काय नुसतीच हागीनदारी..’ त्या पोट धरधरून हसायच्या, जेव्हा एखाद्या परिषदेत कोणी गाणं गायचं. ‘बंबईवाल्याच्या लागून नादी। माझी उरकून टाकली शादी। काय सांगू माझी बरबादी गं। सुन मेरी अमीना दीदी गं। खोली ऐसी की जैसं खुराडं। उस खुराडे में चार चार बिऱ्हाडं। फाटकी गोधडी पार्टीशन मधी गं.. सुन मेरी अमिना दीदी गं। सुभे संडासकु ऐसा झुंबडगा, बारी मिळे तो दरवाजा मोडका। रेल्वे लाइन प भागी म सीधी गं। सुन मेरी अमिनादीदी गं।’

त्यांची शेती संपली होती. त्यांचे जुने बलुते संपले होते. नुसतं घर असून भागणारच नव्हतं. म्हणून त्या एकेकाळच्या शेतकरणी आता मोलकरणी झाल्या होत्या. जुन्या जोखडांची त्यांना आता नव्यानं ओळख होत होती. म्हणूनच आमच्याबरोबर टेंपोत बसून महाडच्या चवदार तळ्यावर जाता जाता त्यांना ‘सुट बुट कोट.. माझ्या भीमाचं गं लेणं..’ यात आसपासच्या जातीपातीच्या भिंतींपलीकडच्या बायांच्या दु:खाशीही ओळख होत होती.

अशा कितीतरी ठिकाणांच्या, क्षेत्रांतल्या, धर्माच्या, जातींच्या अनेकजणी आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनायला लागल्या. दादागिरी विश्व विद्यापीठांकडून आलेली  असंख्य जड ओझी पाठीवर, डोक्यावर खांद्यावर, चेहऱ्यावर बाळगणाऱ्या. ती ओझी कधी स्वीकारणाऱ्या, कधी झिडकारणाऱ्या. पण ताठपणे उभं राहायला धडपडणाऱ्या. मुख्य म्हणजे आम्हालाही शिकवणाऱ्या घडवणाऱ्या.

मुक्ता मनोहर

muktaashok@gmail.com