आदिवासी समाजात नागरी व्यवस्थेबद्दल असणाऱ्या अज्ञानाचा फायदा अन्य समाज घेताना दिसू लागला आणि त्याबद्दल चर्चा सुरू केल्या. तेव्हा हे असंच आहे, असंच असणार असं म्हणणाऱ्या कातकरी, ठाकर बायाही बदलू लागल्या, विचार करू लागल्या. आता आपण शहाण्या झालो आहोत तर अन्याय सहन करायचा नाही, हे ठरले. आणि मग सर्वानी घोषणा दिली, ‘सोसणार नाही अत्याचार, आम्ही लढायला आहोत तय्यार.’

आदिवासी स्त्रीला काहीही विचारलं तर सुरुवातीला ती बोलायला अनुत्सुक असे. कातकरी बाई म्हणणार, ‘काय जून?’(माहीत नाही) आणि ठाकर असेल तर ‘मला नाय ठावं’. जगायची धडपड करणाऱ्या या बायांशी हळूहळू ओळख, मैत्री झाली आणि मग त्यांच्या दैनंदिन जगण्याबद्दल त्या बोलू लागल्या. बाहेरून पाहताना छान वाटणाऱ्या त्यांच्या जगण्यात व्यवस्थेने निर्माण केलेले अडथळे त्या पार करतात की जगण्याचा भाग म्हणून स्वीकारतात हेही लक्षात येऊ लागले. एकूणच आदिवासी समाजात नागरी व्यवस्थेबद्दल असणाऱ्या अज्ञानाचा फायदा अन्य समाज घेताना दिसू लागला आणि त्याबद्दल चर्चा सुरू केल्या, तेव्हा हे असंच आहे, असंच असणार असं म्हणणाऱ्या बायाही बदलू लागल्या, विचार करू लागल्या. त्याविरुद्ध आवाज उठवू लागल्या.

गाव शिबिरे सुरू झाली. त्यात अनेक विषयांवर चर्चा होऊ  लागल्या. ‘खाकी कपडेवाल्यांना आपण एवढे का घाबरतो?’ ‘त्यांच्याकडे कायदा आहे, दंडुका आहे, माणसाला तुरुंगात टाकण्याचा अधिकार आहे.’ या भीतीपायी गावात खाकी वर्दीवाला दिसला की, पुरुष रानात पळून जात आणि बाया रानात लपून बसलेल्या आपल्या माणसाची काळजी घेत खाकी वर्दीवाल्याच्या सरबराईला लागत. मटण, दारूचे जेवण वर पैसे नाहीतर रानातून मोठय़ा कष्टाने आणलेल्या मध, लाकडांची मोळी इत्यादी वस्तू, पिकविलेला भाजीपाला, धान्य, कोंबडय़ा, बकऱ्या सर्वच फुकटात या कर्मचाऱ्यांना द्यावे लागायचे. कष्टाने काटकसरीने संसार करणाऱ्या बाईला हे जास्तच खुपायचे. दारूच्या धुंदीत बाईवर हात टाकणारेही असत. हा पोलिसांचा, फॉरेस्ट गार्डाचा त्रास थांबला पाहिजे असं सर्वजणी म्हणायला लागल्या.

हे सर्व चुकीचे आहे, त्रासदायक आहेच, पण आपल्यावर अन्याय करणारे आहे, हे कळायला हक्काबद्दलची जाणीव निर्माण व्हायला हवी. त्यासाठी मग पोलीस कायदा, वन कायदा समजून घेण्याची शिबिरे सुरू झाली. नव्याने समजलेली माहिती त्यांना चकित करणारी होती. नवीन माहिती कळल्यावर आपली फसवणूक होतेय हे समजून घ्यायला वेळ लागे. पण एकदा का कळले की, मग फसवले गेल्याच्या दु:खाबरोबर फसविणाऱ्याबद्दल राग दाटून येई. हा पेच सोडवायचा तर आपणच काहीतरी केलं पाहिजे हेही पटायला लागले होते. आदिवासी जंगल राखत असेल तर त्याला दैनंदिन गरजपूर्तीसाठी जंगलाचा उपभोग घेण्याचा अधिकार असला पाहिजे. ‘कसेल त्याची जमीन’ हे सरकारी धोरण असेल तर जंगलासाठीपण तेच धोरण असले पाहिजे. सरकारी नोकराला त्याच्या कामाचा पगार मिळतो मग आपण कशाला त्याला वर पैसे द्यायचे? आपल्या कष्टावर त्याला फुकटचे खाऊ  द्यायचे नाही. आपण आपल्या कष्टावर जगतो. आपण चोर, गुन्हेगार नाही. आपण अन्याय सहन करतो म्हणून ते अन्याय करत राहतात. आता आपण शहाण्या झालो आहोत तर अन्याय सहन करायचा नाही हे ठरले. आणि मग प्रथम भिडल्या त्या वन आणि पोलीस खात्याच्या दादागिरीला. सरकारी नोकरांची मनमानी व शिरजोरी खपवून घ्यायची नाही. वन खात्याला फुकट वेठी घालायच्या नाहीत. घर बांधलं, दुरुस्त केलं की गार्डाला दारू, कोंबडीचे जेवण द्यायचे नाही. गावात पोलीस आला तर पळून जायचे नाही. सर्वानी घोषणा दिली, ‘सोसणार नाही अत्याचार, आम्ही लढायला आहोत तय्यार.’

एकदा गावात दारू पिऊन कोंबडीसाठी धिंगाणा घालणाऱ्या गार्डाना बायांनी घेराव घातला आणि त्यांची वरात काढली पोलीस ठाण्यावर. पोलीस तक्रार घेईनात तेव्हा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने गुन्हा दाखल करायला भाग पाडले. वेठ घेणाऱ्या वनपालावर केस करून मजुरीचे पैसे वसूल केले. गावात येऊन विनाकारण त्रास देणाऱ्या पोलिसांविरुद्ध मोर्चे काढायलादेखील बिचकल्या नाहीत बाया.

एकीकडे सरकारी अत्याचाराला भिडताना किमान वेतनाचा, बांधील गडी निर्मूलन कायदा, समान कामाला समान वेतनाचा कायदा समजून घेतला आणि त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरला. आजवर ज्या खाकी वर्दीला घाबरत होत्या, गावातील शेठ, सावकारांना दबून होत्या त्या त्यांना जाब विचारू लागल्या. कामाचे हिशोब मागू लागल्या तेव्हा संघर्ष अटळ होता. पण कायद्याची मदत आणि एकजुटीचे बळ त्यांना हक्कासाठी लढायची ताकद देत होते. तेव्हा अत्याचार प्रतिबंधक कायदाही नव्हता. पण बायांचा जिद्द आणि आपल्या सचोटीवर विश्वास होता. आम्ही अन्याय सहन करणार नाही तसंच आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, ही भूमिका घेऊन प्रश्नांना भिडणं सुरू झाले. लहान लहान प्रतिकाराच्या घटनांमधून मिळणारे यश त्यांना आत्मविश्वास देणारे होते. आजवर त्या एकत्र जमत होत्या केवळ सणावारासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमात. त्यात आनंद मिळत होताच. आता अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढताना एकजुटीची ताकद कळायला लागली.

आदिवासी कुटुंबांनी कोळसाभट्टीवर जगायला जाणं तर अनेक वर्षांपासूनचं. १९८३ ते ८८ या पाच वर्षांत कोकणातील रत्नागिरी जिल्हा अक्षरश: पिंजून काढला. तेव्हा पंचवीस हजारांहून अधिक कुटुंबे व त्यांच्याबरोबर मराठवाडय़ातील शेकडो बंजारा कुटुंबे आपली गावे सोडून परमुलखात येऊन सातआठ महिने राहत होती हे लक्षात आले. आपल्या लहानग्यांना घेऊन या आया उघडय़ावर कशा जगत असतात, याची आपल्याला कल्पनाच करता येणार नाही. शिवाय केलेल्या कामाचा मोबदला मिळण्याची खात्रीही नाही. अशा वेळी बाया मुले धंद्याच्या कामाव्यतिरिक्तचा वेळ रानात आपलं खाणं धुंडाळण्यात घालवीत. मालकाच्या वाईट नजरांपासून बचावण्याचे कामही असेच. एकदा तर चिपळूणजवळ सुधागड तालुक्यातील काही कुटुंबे रस्त्याने चालताना दिसली. आम्ही चौकशी करू लागताच घाबरून रानात पळाली. शेवटी माझी ओळख पटली तेव्हा बोलायला लागली. गावातील बाई बाळंतपणात दगावली होती. तान्हं मूल गावी सोडून येतो, ही त्यांची मागणी मालकाने धुडकावली. तेव्हा पळून जाण्याशिवाय त्यांच्यापुढे मार्ग नव्हता. आम्ही या प्रकरणाची रीतसर चौकशीची मागणी केली, तसेच त्या कुटुंबाला शासनाने मदत करावी असा आग्रह जिल्हाधिकाऱ्यांकडे धरला. त्यांनी मजुरांना गावी जाण्यासाठी वाहनाची सोय केली, गावी पोहोचेस्तोवर ते तान्हं मूल दगावलं होतं. नंतर त्यांचा अहवाल आला ‘बाई रानात  साप चावून मेली.’ सगळंच अवघड होतं. पण आम्ही आठवडा बाजार फिरत राहिलो, कोळसा व्यवसायाचा काळा चेहरा समाजासमोर आणीत राहिलो. कोणत्याही संरक्षण व सोयीविना जगणाऱ्या या कुटुंबांना संघटित केले.

कोळसा वाहतुकीसाठी आलेल्या लमाण झुमरूबाईने आपल्याला वाचवण्याच्या नादात आपल्या हक्काचे मजुरीचे पैसे सोडून पळ काढला होता. पैशाशिवाय आपली तीन मुले आणि ८-१० बैल घेऊन ती रत्नागिरीहून मराठवाडय़ातील गावी पायी निघाली होती. आमची तिची वाटेत गाठ पडली तेव्हा तिला घेऊन आम्ही तिच्यावरील अन्यायाची दाद मागायला राजापूरच्या तहसीलदारांसमोर उभी केली. त्यांनी सर्व प्रकरण लक्षात घेऊन तिचे हक्काचे पैसे तिला देण्याचा हुकूम मालकाला दिला. तेव्हा झुमरूबाईने ‘मला पैसे नको, पण माझ्या अब्रूवर हात टाकणाऱ्या मालकाला शिक्षा झाली पाहिजे’ असे म्हणत गरीब बाईलादेखील आत्मसन्मान असू शकतो हे तहसीलदारांना ठणकावून सांगितले. अशीच एक यमुना. जेव्हा मजुरांना मजुरी द्यायला लागू नये म्हणून मालक फसवून बसगाडय़ात बसवून मजुरांना घेऊन जायला आला तेव्हा यमुनाच्या धाडसाने रस्त्यावर १० तास गाडय़ा अडवल्या. त्यामुळे पेण तालुक्यातील गागोदे हेटवणे परिसरातील मजुरांना लाखाहून अधिक रुपये वसूल करता आले. एकूण या संघटना बांधणीत या स्त्रियांचा पुढाकार मोलाचा होता.

१९८० नंतर उरण पनवेलचे शहरीकरण सुरू झाले आणि आसपासच्या गावांत वीटभट्टय़ा सुरू झाल्या. अनेक कातकरी कुटुंबे या व्यवसायात ओढली गेली. विठ्ठलवाडीच्या वीटभट्टीवर बांधील गडी म्हणून काम करणारी सात कुटुंबे नवशीच्या पुढाकाराने सुटली. आणि वीटभट्टी मजूर संघटना उभी राहिली. लेखी कराराशिवाय धंद्यावर जायचे नाही. अंगावरचे काम असले तरी कामाचे स्वरूप, वेळा आणि हजारी भाव आधी ठरवून घ्यायचा, हिशोबाच्या चोपडय़ा मागायच्या आणि मालकाची मुजोरी खपवून घ्यायची नाही या सुरुवातीच्या ठरावात नंतर भर पडली ती मुलांचे शिक्षण थांबवायचे नाही.

दारू गाळणं ठाकरांचे काम, पण दारू पिऊन झिंगून पडलेल्या ठाकरबाया कधी दिसायच्या नाहीत. रस्त्यावर मस्त झिंगून पडलेल्या दिसत त्या कातकरी बाया. तसा दारू हा सर्वच कष्टकरी समाजाचा प्रश्न. मूळ आदिवासी संस्कृतीत बाईने दारू, बिडी पिणं निषिद्ध नव्हतंच. घरी कुणी पाहुणा आला तर त्याचा पाहुणचार, सणवार असला, कुटुंबात काही कार्य असलं तरच दारू आणली जायची आणि मुलाबाळांसकट सर्वजण ती प्यायचे. पण  दारूचे व्यसन त्यांच्या संस्कृतीचा भाग नव्हता. आजूबाजूच्या गावातील शेतकरी कुटुंबे, कोळसाभट्टी, वीटभट्टी मालक स्वस्तात भरपूर कष्ट करणारे मजूर मिळावेत म्हणून आदिवासी कुटुंबांना रोख मजुरीऐवजी पोस्त म्हणून दारू पाजत. गावबैठकीत या दारुडय़ांचा खूप त्रास होई. तेव्हा त्याचा बंदोबस्त कसा करावा? चर्चेअंती निर्णय झाला, बैठकीला दारू पिऊन येणाऱ्याला दंड करायचा. पण दारुडी व्यक्ती दंड भरून पुन्हा दंड वसूल करणाऱ्याला शिवीगाळ करू लागे. मग नवीन युक्ती काढली दारुडय़ाने दारू उतरली की, आपल्या बायकोच्या पाया पडायचे. गंमत म्हणजे गावातील बहुसंख्य बाया पिणाऱ्या होत्या. मग काय करायचे? गावात दारूच गाळू द्यायची नाही आणि विकूही द्यायची नाही. ही सर्व दारू हातभट्टीची म्हणजे बेकायदा होती. रानसई गावातील महिला मोर्चा घेऊन पोलीस ठाण्यावर गेल्या तेव्हा तेथील सायबाने या बायांनाच दम देऊन पिटाळून लावले. तेव्हा पोलिसांची मदत न घेता दारू विकणाऱ्या माणसांवरच संघटितपणे बायांनी जरब बसवली.

अशा प्रकारे अनेक गावांत दारूबंदी होऊ लागली. गावात दारू मिळत नाही म्हटल्यावर पिणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. गावकी फंड उभे राहिले. गावसभा नीट होऊ लागल्या. आता बायांना रोज नवीन काहीतरी करण्याची स्वप्नं पडू लागली.

(क्रमश:)

सुरेखा दळवी surekhadalavi@yahoo.com