राज्यातील एकाही विद्यापीठाचा समावेश अव्वल दर्जाच्या जागतिक क्रमवारीतील २०० विद्यापीठांमध्ये नाही, याबद्दल राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी खंत व्यक्त केली. त्याचबरोबर गोदावरी खोऱ्यातील हक्काचे १५० टीएमसी पाणी पूर्ण क्षमतेने वापरले जात नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते वापरण्यासाठी तातडीने पावले टाकण्यात यावीत आणि विभागीय अनुशेष दूर करण्यासाठीही पावले टाकण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यपाल राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि मुख्य सचिवांसह उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. विद्यापीठांनी आपला दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तरच ते जागतिक क्रमवारीत अव्वल ठरतील. त्यासाठी विद्यापीठांमधील संशोधनाचा दर्जाही उंचावण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गोदावरी खोऱ्यातील सुमारे १५० टीएमसी पाणी पूर्णपणे वापरले गेले, तर शेतकऱ्यांचा मोठा लाभ होईल. त्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले टाकावीत, असे राज्यपाल राव यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत एप्रिल २०१५ मध्ये संपत आहे. केळकर समितीच्या अहवालानुसार विभागीय अनुशेष भरून काढण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचनाही राज्यपालांनी दिल्या. अमरावती विभागात सिंचनाचा अनुशेष आहे. विदर्भ व मराठवाडय़ाचा शासकीय सेवेत अनुशेष असून तो दूर करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबई विद्यापीठाने इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन ३ ते ७ जानेवारीदरम्यान मुंबईत केले असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याच्या संयोजन व समन्वयासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत संबंधितांना दिल्या.