मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य आणि अर्थशास्त्र विषयाशी संबंधित अभ्यासक्रम चालविण्याची मान्यता असलेल्या एच. आर. महाविद्यालयातील एम.बी.ए. अभ्यासक्रमाबाबत चौकशी करण्याचे आदेश तंत्र शिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी दिले आहेत.
या संदर्भातील अहवाल दोन दिवसांत सादर होणार असून यामध्ये महाविद्यालय दोषी आढळल्यास त्यांच्यावर अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठय़क्रम प्रतिबंध अधिनियम २०१३नुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.
एच. आर. महाविद्यालयाने रूटबर्स बिझनेस स्कूलशी सहकार्यकरून महाविद्यालयात ए. बी. ए. अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे निकष पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र ते निकष पूर्ण केले नसल्याचा आरोप प्रहार विद्यार्थी संघटनेने घेतला आहे.
यासंदर्भात त्यांनी तंत्र शिक्षण संचालनालयाला पत्र लिहीले आहे. या पत्राला अनुसरून महाजन यांनी चौकशीचे आदेश काढले आहेत. याची चौकशी सिडनहॅम महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्फत केली जाणार असून दोन दिवसांत अहवालही सादर करण्यात येणार आहे. या महाविद्यालयातील पायाभूत सोयीसुविधांबाबात चौकशी करावी तसेच महाविद्यालयात एमबीएसाठी कारण्यात येणारे २५ हजार डॉलर्सचे शुल्क कोणत्या निकषांनुसार आकारले गेले याचीही चौकशी व्हावी अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे आणि सरचिटणीस अॅड. अजय तापकीर यांनी केली आहे.