प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी राज्य सरकारने लागू केलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१४ (टीईटी) यंदा डिसेंबरमध्ये होणार आहे. यंदा होणारी ही दुसरी परीक्षा आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी ही पात्रता परीक्षा आवश्यक केली होती. तिचा निकाल अत्यंत कमी लागला होता. पात्रता परीक्षेनंतर वर्षभरात राज्यात कोठेही भरती झालेली नाही. त्यामुळे या परीक्षेस प्रतिसाद कसा मिळतो याबद्दल उत्सुकता आहे.
जिल्ह्य़ांमध्ये डीएड उमेदवारांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (पेपर क्र. १) १४ डिसेंबरला सकाळी १०.३० ते दुपारी १ दरम्यान तर बीए, बीएडसाठीची परीक्षा (पेपर क्र. २) १४ डिसेंबरलाच दुपारी २.३० ते सायंकाळी ५ दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थीकडून केवळ ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पूर्वी शिक्षणशास्त्र पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर थेट शिक्षणसेवक म्हणून भरती होता येत होते. परंतु आता प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी हवी असल्यास त्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.