मान्यता नसतानाही शिक्षण देणाऱ्या राज्यातील ६७ तंत्र शिक्षण संस्थांचे बिंग फुटले आहे. माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीला उत्तर देताना तंत्र शिक्षण संचालनालयाने या महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये राज्यातील अनेक नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे.
आरटीआय कार्यकत्रे अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे तंत्र शिक्षण महासंचालनालयाच्या अख्यत्यारीतील मान्यताप्राप्त नसलेल्या संस्थांची माहिती विचारली होती. या संदर्भात महासंचालनालयातील सहाय्यक संचालक सुरेखा गोसावी यांनी दिलेल्या उत्तरात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मान्यता नसलेल्या ६७ संस्था असल्याची माहिती दिली. राज्यातील या ६७ संस्थेमध्ये खाजगी संस्थाचाही समावेश आहे. २३ डिसेंबपर्यंत मान्यता नसलेल्या संस्थांमध्ये सर्वाधिक ३३ संस्था मुंबईतील आहे. त्यानंतर १३ नवी मुंबई, ८ पुणे, ४ ठाणे, ३ नाशिक, २ कल्याण आणि भिवंडी, अहमदनगर, औरंगाबाद आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी एका संस्थेचा यात समावेश आहे.