28 May 2016

२५ टक्के आरक्षित जागांचे प्रवेश

शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या गोंधळावर अखेर पडदा पडला असून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील

प्रतिनिधी पुणे | December 6, 2012 6:19 AM

शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या गोंधळावर अखेर पडदा पडला असून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांसाठीचे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणाच्या तरतुदीनुसार विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी राज्यभरामध्ये अडीच लाख विद्यार्थी आरक्षणांतर्गत प्रवेश घेतील असा अंदाज शिक्षण विभागाकडून बांधण्यात आला आहे. विनाअनुदानित अल्पसंख्यांक शाळा वगळून इतर सर्व शाळांची प्रवेश प्रक्रिया या वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याकरता जिल्हास्तरावर नियंत्रण पथक स्थापन करून पथकातील सदस्यांचे आणि नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. १ ते १० जानेवारी या कालावधीमध्ये या प्रवेश प्रक्रियेबाबत गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची समन्वय सभा घेण्यात येणार आहे.  या वेळापत्रकासंबंधी आधिक माहिती www.mhdoesecondary.com  या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

ज्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणाअंतर्गत राखून ठेवलेल्या जागांपैकी जागा शिल्लक राहिल्यास, शासनाच्या परवानगीने त्या जागांवर शाळा इतर वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार आहेत.

प्रवेशाचे वेळापत्रक
* ११ ते ३० जानेवारी या कालावधीमध्ये प्रवेश अर्जाची विक्री व स्वीकृती करण्यात येणार आहे. शाळांनी त्यांच्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रवेश अर्जाच्या विक्री आणि अर्ज स्वीकारण्याबाबत सूचना देणे आवश्यक आहे.
* १ ते १५ फेब्रुवारी या काळात आलेल्या अर्जाची छाननाी करून पात्र विद्यार्थ्यांंची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. शाळेने एखाद्या विद्यार्थ्यांचा अर्ज फेटाळल्यास तीन दिवसांच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याची कारणे लेखी कळवणे आणि त्याची प्रत शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवणे आवश्यक आहे.
* १६ ते २० फेब्रुवारीच्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ज्या शाळेमध्ये जागेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत, त्या शाळेमध्ये सोडत काढून प्रवेश देण्यात येणार आहेत.
* २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शाळांनी प्रवेशाची यादी आणि प्रतिक्षा यादी जाहीर करायची आहे. उपलब्ध जागांपेक्षा कमी अर्ज आले असतील, तर उपलब्ध प्रवेश अर्जामधून प्रवेश देऊन रिक्त जागांसाठी पुन्हा अर्ज मागवण्यात येणार आहेत.
* २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शाळांनी प्रवेश प्रक्रियेचा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. शाळांकडून प्रवेश प्रक्रियेचा अहवाल मिळाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी सात दिवसांच्या कालावधीमध्ये शिक्षण संचालनालयाकडे अहवाल पाठवायचा आहे.         

First Published on December 6, 2012 6:19 am

Web Title: admissions for 25 reserved vacancies
टॅग Admission,Education