नवीन अभ्यासक्रम व पाठय़पुस्तकांबाबत शिक्षक व तज्ज्ञांचे नुकतेच झालेले शिबीर कधी नव्हे ते स्थळावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आतापर्यंत पुण्याच्या महात्मा फुले भवनात अभ्यास मंडळाची शिबिरे होत. परंतु, प्रथमच उत्तन येथील ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचे केंद्र असलेल्या ठिकाणी मंडळाची बैठक पार पडल्याने हा वाद उद्भवला आहे.
या बैठकीत अभ्यासक्रम बदलाच्या चर्चेकरिता राज्यभरातून २०० शिक्षक व तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. नवा अभ्यासक्रम व पाठय़पुस्तके कशी करायची याचे मार्गदर्शन या वेळी देण्यात आले. या बैठकीला शिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्याव्यतिरिक्त शिक्षण संचालक व अधिकारी उपस्थित होते. सहावी ते बारावी यांचे नवे अभ्यासमंडळ तयार करण्यासाठी नियोजित तज्ज्ञांना बोलावून त्यांचे उद्बोधन करणे हा या शिबिराचा उद्देश होता. परंतु, शिक्षण मंडळातील ख्यातनाम व मान्यवर शिक्षणतज्ज्ञांना डावलून हे शिबीर घेतल्याचा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.
शिक्षणाची गुणवत्ता, जागतिक प्रवाह, परिणामे, शिक्षणाचा सैद्धांतिक हेतू आणि रचनावाद यावर चर्चा करण्याऐवजी गेल्या २० वर्षांत शिक्षण क्षेत्रात चुकीचेच कसे झाले यावर चर्चेचा भर होता. तसेच, पुण्याच्या शिक्षण मंडळाच्या फुले भवनऐवजी प्रबोधिनीची जागा बैठकीसाठी निवडून अभ्यासक्रमाचे संघीकरण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कामचुकार शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना केवळ राजकीय पोटशूळ असल्यामुळे आणि त्यांच्या विचाराच्या शिक्षकांना, त्यांच्या मर्जीने अभ्यास समितीमध्ये प्रवेश मिळवून न देता आल्यामुळे नैराश्येपोटी बिनबुडाचे आरोप केल्याची टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.