राज्य सरकारने केलेल्या हेल्मेटसक्ती विरोधात लढा उभारण्याचा निर्णय येथे हेल्मेटविरोधी संघर्ष समितीने केला. ही सक्ती रद्द करण्यासाठी कोल्हापुरात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार करण्याबरोबरच आंदोलनाची सुरुवात पुढील आठवडय़ात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हिंदू एकता आंदोलन समितीच्या कार्यालयात हेल्मेटविरोधी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी हेल्मेटविरोधी संघर्ष समितीची बठक झाली. समितीचे निमंत्रक जयकुमार िशदे यांनी हेल्मेट सक्ती जनतेवर अन्यायकारक असून सक्ती करणाऱ्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा निषेध नोंदवला. ते म्हणाले, हेल्मेटच्या सततच्या वापरामुळे मणक्यांचा त्रास होतो. ते नेहमी हाताळणे सोयीस्कर नाही. जिल्ह्यात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या प्रकारात चोरटय़ांनी हेल्मेटचा वापर केल्याचे स्पष्ट झाल्याने असे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे.

रामेश्वर पत्की म्हणाले, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, शाळा-महाविद्यालय, विविध शासकीय-खासगी कार्यालयांतील दुचाकीधारकांची रॅली, परिवहन कार्यालयासमोर हेल्मेट फोडो आंदोलन, स्वाक्षरी मोहीम आदी टप्प्यांनी आंदोलन तीव्र केले जाईल. किसन कल्याणकर म्हणाले, या आंदोलनाअंतर्गत पहिल्या टप्प्यात हेल्मेट सक्तीविरोधातील दहा हजार पत्रकांचे वाटप केले जाईल.  नितीन जोशी म्हणाले, हेल्मेटसक्ती करण्याऐवजी रस्त्यांची अवस्था सुधारणांसह वाहतुकीच्या नियम पालनाबाबत प्रबोधनाची मोहीम शासनाने राबवावी.