येत्या १ जुलपासून राज्यातील सर्व शाळांतील पोषण आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थाचा समावेश करण्यात येणार आहे. याद्वारे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जादा पसे मिळतील, अशी घोषणा महसूल, दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी केली. राज्यात सर्वत्रच दूध दर समान असणे गरजेचे आहे. यासाठी खासगी व सहकारी दूध संस्था एकत्र येऊन निश्चित असे धोरण राज्य शासन लवकरच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. उदगांव (ता. शिरोळ) येथील गोकूळ दूध संघाच्या सॅटेलाईट डेअरी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी खडसे बोलत होते.
दूध व्यवसायातील भेसळ रोखण्यासाठी भेसळ गंभीर मुद्दा असल्याच्या उल्लेख करून खडसे यांनी हा प्रकार रोखण्यासाठी शासन पावले टाकत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, दुधातील भेसळ ओळखणारी लहानलहान यंत्रे तयार केली आहेत. त्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला सहजरीत्या दुधातील भेसळ ओळखता येईल. एक टोलफ्री क्रमांकही दिला जाईल. या क्रमांकावर कळविल्यानंतर तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल. दूध उत्पादकांसमोर असलेल्या अडचणीचा शासन गंभीरतेने विचार करून निश्चितच धोरणात्मक निर्णय घेऊन दूध उत्पादकांना न्याय देण्याचा विचार केला जाईल असे आश्वासनही खडसे यांनी दिले.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांना व संघांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे. संघासमोर दूधभेसळीचा फार मोठा प्रश्न आहे. भेसळखोरांमुळे प्रामाणिकपणे दूध उत्पादन करणाऱ्यांवर अन्याय होत आहे. शालेय पोषण आहारात दुग्धजन्य पदार्थाचा समावेश करावा, त्याचबरोबर जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित असे धोरण ठरविणे गरजेचे आहे.

माजी अध्यक्ष लक्ष्य
गोकूळचे सर्वोसर्वा माजी आमदार महादेव महाडिक यांनी माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांना लक्ष्य केले. मात्र काही मंडळी राजकारण करीत आहेत. स्वत:च्या निष्क्रीयतेमुळे घरी बसलेले संघावर िशतोडे उडवण्याचे काम करीत आहेत. त्यांनी िशतोडे उडवण्याऐवजी प्रवाहात सामील व्हावे.