इचलकरंजीतील आगळावेगळा प्रारंभ
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळय़ा ठिकाणी झाले असून, या सर्व घटनांना छेद देणारा प्रकार ‘डोम’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पाहायला मिळाला. स्मशानभूमी ही चांगल्या कामासाठी निषिद्ध मानली जाते, पण त्याज्य मानल्या जाणाऱ्या या भूमीतच ‘डोम’ चित्रपटातील कलाकार स्मशानभूमीत प्रमोशनसाठी आल्याची वेगळी घटना इचलकरंजीत घडली.
मराठी चित्रपट विविध विषयांवर, कथेवर बनत असले तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यांची जाहिरात होत नाही, अशी ओरड आपणास ऐकावयास मिळते, पण आगामी ‘डोम’ या चित्रपटाने प्रसिद्धीचा आगळावेगळा फंडा वापरून मराठी चित्रपटांनी प्रसिद्धी क्षेत्रातही कात टाकल्याचे दाखवून दिले आहे.

सह्णााद्री पिक्चर्सतर्फे प्रदीप दळवी दिग्दर्शित ‘डोम’ या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून चक्क या चित्रपटातील मुख्य कलाकार डॉ. विलास उजवणे यांच्यासह इतर कलाकारांनी इचलकरंजीतील पंचगंगा स्मशानभूमीतील अमरय्या हिरेमठ-स्वामी यांची भेट घेतली. कारणही तसेच आहे. अमरय्या स्वामी हे स्मशानभूमीत प्रेतावर अंत्यसंस्कार करण्याचे काम करतात आणि ‘डोम’ हा चित्रपट अशाच व्यक्तीवर आधारित आहे.

आज काळ बदलला, जग बदलले तरी काही चालीरीती तशाच. समाजाचा एक भाग अजूनही बदलांच्या टप्प्यावर येऊ शकलेला नाही. किंबहुना समाजाला त्यांची आत्यंतिक गरज असल्यामुळेच त्यांना बदलाच्या टप्प्यावर येऊ दिलेच जात नाही. असाच वर्षांनुवर्षे अन्याय होत असलेला समाज म्हणजे डोम समाज. माणसाच्या अंतिम क्षणांना मोक्ष देणारे काम करणारा हा महत्त्वाचा घटक तरीही हेतूपूर्वक समाजव्यवस्थेकडून डावलला गेलेला. असे असले, तरीही कधी ना कधी तरी बदलाची ऊर्मी निर्माण होतेच. अशाच एका बदलाची ऊर्मी असलेल्या डोमचे धगधगते आयुष्य पडद्यावर मांडणारा एका वेगळय़ा विषयावरचा संघर्षपूर्ण धगधगता जीवनप्रवास असलेला डोम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा ठाम विश्वास डॉ. विलास उजवणे यांनी या वेळी व्यक्त केला.

डॉ. विलास उजवणे, अनिता नाईक, आर. एल. तांबे, सचिन संत व प्रदीप दळवी यांनी स्मशानभूमीत स्वामींची भेट घेऊन त्याचे कार्य व व्यथा जाणल्या. या वेळी स्वामींनी असे चित्रपट बनण्याची गरज असल्याचे सांगितले. सदर भेट घडवून आणण्यासाठी चाणक्य अंत्यसंस्कार सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार भुतडा, किरण दंडगे, हिराचंद बरगाले, ब्रजमोहन मर्दा, दामोदर राठी, प्रकाश पोटे, कमलकिशोर तिवारी यांनी सहकार्य केले.