काँग्रेस, भाजपशी आघाडीवरून मतमतांतरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मतभेदांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात उचल खाल्ली असल्याचे शुक्रवारी दिसून आले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपसोबत निवडणूक लढवणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे म्हणणे असताना आज आमदार हसन मुश्रीफ यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी काँग्रेसशी होणार असल्याचे स्पष्ट केल्याने मतभेद चव्हाट्यावर आले. तर, पक्ष निरीक्षक दिलीपतात्या पाटील यांनी स्थानिक पातळीवर आघाडी कोणाही समविचारी पक्षाशी करावी लागेल, अशी भूमिका मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आज पक्ष कार्यालयात घेतल्या. या वेळी पक्ष निरीक्षकांसह पक्षातील प्रमुखांनी भूमिका व्यक्त केली. त्यामध्ये पक्षाने आघाडी कोणाशी करायची हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्याभोवतीच चर्चा फिरत राहिली.

पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपसोबत निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. त्याचे पडसाद आज मुलाखतस्थळी उमटले. आमदार मुश्रीफ यांना त्यावर तातडीने खुलासा करावासा वाटला. त्यांनी महाडिकांच्या विरुद्ध बाजूची भूमिका मांडत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी काँग्रेसशी होणार असल्याचे सांगतानाच महाडिक यांची कोंडी केली. महाडिक यांनी भाजपशी आघाडी करण्यासाठी कोणाची परवानगी आणली हे आपल्याला माहीत नव्हते. त्यांनी अचानकपणे असे सांगितले होते, असा खुलासाही त्यांनी केला.  पक्ष निरीक्षक दिलीपतात्या पाटील यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करताना अन्य पक्षाशी जमवून घ्यायचे झाल्यास पक्षाचे घड्याळ चिन्ह घेता येणार नाही, असे सांगितले. धर्यशील माने यांनी स्थानिक परिस्थितीचा कानोसा घेऊन आघाडी करण्याची परवानगी असावी, असे मत मांडले. शाहूवाडी तालुक्यात मानसिंगराव गायकवाड हे घड्याळ चिन्हावर दोन जागा लढवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिली.