शहरातील धार्मिक स्थळे निष्कासित करणे, स्थलांतरित करण्याच्या कोल्हापूर महापालिकेच्या भूमिकेविरोधात बजरंग दलाने सर्व गणेश मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हरकतींवर नागरिकांच्या सह्या गोळा करण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बठकीत घेतला आहे.
शहरातील अनधिकृत मंदिरे, प्रार्थनास्थळे हटविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठविला आहे. याबाबत शुक्रवारी बजरंग दलाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यामध्ये सर्व गणेश मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हरकतींवर नागरिकांच्या सह्या गोळा करण्याची मोहीम राबविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच नागरिकांनी मंदिरांचे व्यवस्थापन, वाहतूक, वाहनतळ अडथळे, भिक्षुक आदींच्या अनुषंगाने सकारात्मक बदल करावयाच्या सूचना बजरंग दलाच्या मंगळवार पेठ येथील कार्यालयात दाखल कराव्यात. त्यासाठी विविध संस्था, तालीम मंडळ यांनी हरकत दर्शविणारे ठराव पाठवावेत असे आवाहनही या वेळी करण्यात आले. बैठकीस बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे, शहरप्रमुख महेश उरसाल, शिवसेनेचे किरण पडवळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.