हवालाचे पसे ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करुन ३० लाखांची रोकड तिघा दुचाकीस्वारांनी जबरदस्तीने लुबाडण्यात आली. शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून नजीक असणाऱ्या राधाकृष्ण हॉटेल नजीक शनिवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून रविवारी त्याची फिर्याद एम. माधव कंपनीचे व्यवस्थापक अरुणभाई अमृतभाई सुतार (वय ४२ रा. सांगली मूळ रा. गुजरात) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
धवलभाई पटेल यांच्या मालकीची एम. माधवलाल अँड कंपनी असून ती हवाला मार्फत पसे पाठविण्याचे काम करते. कंपनीच्या सांगली येथील कार्यालयात सुतार यांच्यासह रामभाउ पटेल व राकेश पटेल कामास आहेत, तर चिंतन पटेल उर्फ पिंटू हे सांगली कार्यालयाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. शनिवारी पिंटू यांनी अरुणभाई सुतार यांच्याकडे हवाल्याची ३० लाखांची रक्कम कोल्हापुरात घेऊन जाण्यासाठी दिली. सुतार हे काल सायंकाळी ६ वाजता सांगली वरून रोकड घेऊन एस टी ने कोल्हापूरला आले. कावळा नाका येथे आल्यानंतर सुतार यांनी कोल्हापूर कार्यालयाचे व्यवस्थापक निकेश जयंतीलाल पटेल यांना फोन करुन मध्यवर्ती बसस्थानक येथे येण्यास सांगितले.
निकेश पटेल व सुतार दुचाकीवरून कार्यालयाकडे जात होते. स्टेशन रोड वरून हॉटेल राधाकृष्ण समोर असणाऱ्या रोडवरून जात असताना एक युवक आपली दुचाकी रस्त्यात आडवी थांबवून उभा होता. यामुळे निकेश यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला. याच वेळी पाठीमागून पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी निकेश पाटील यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकी रस्त्यावर आडवी लावून उभ्या असलेल्या युवकाने निकेश व सुतार यांना मारहाण केली. तर अन्य दुसऱ्या दुचाकीवरील तरुणाने पशाची बॅग लंपास केली. वसंत अंगण सोसायटीमाग्रे चोरट्यांनी पलायन केले. अरुण सुतार व निकेश यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच शहरातील चारही पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि गुन्हे शोध पथकांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रदीप देशपांडे पोलीस उपाअधीक्षक भारतकुमार राणे यांनी रविवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी तातडीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची बठक घेऊन तपासाबाबत त्यांना पुढील सूचना केल्या आहेत.

जबाबात विसंगती
एम. माधव कंपनीचे कर्मचारी निकेश व अरुण सुतार यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. दोघांच्याही जबाबात विसंगती आढळून आल्याने या दरोड्यामध्ये कंपनीमधील कोणी सहभागी आहे काय याचा शोध पोलीस घेत आहेत. ३० लाखांची रोकड सांगलीहून कोल्हापूरकडे येत असल्याची अचूक खबर कंपनीतूनच मिळाली असल्याचा संशय पोलिसांना आहे.