ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्राने पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी तिकीट पक्के केले आहे.
गेल्या वर्षी ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर अभिनवने स्पर्धात्मक नेमबाजीऐवजी छंद स्वरूपात खेळायला सुरुवात केली होती. मात्र रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न करेन, असे अभिनवने म्हटले होते. चांगवोन, दक्षिण कोरिया आणि फोर्ट बेनिंग, अमेरिका येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात अभिनवला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र म्युनिच, जर्मनी येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात अभिनवने १० मीटर एअर रायफल प्रकारात, सहावे स्थान मिळवत आणखी एका ऑलिम्पिकच्या दिशेने पाऊल टाकले.
अभिनवने १२२.४ गुणांची कमाई केली. या प्रकारात अंतिम फेरी गाठण्यासाठी त्याने पात्रता फेरीत ६२७.५ गुण मिळवले. चीनच्या झ्यू क्विआनने या प्रकारात सुवर्णपदक तर रशियाच्या व्लादिमीर मासलेनिकोव्हने रौप्यपदक पटकावले.
प्रत्येक देशातर्फे ३० नेमबाजपटू ऑलिम्पिकसाठी पात्र होऊ शकतात. भारताकडून आतापर्यंत जितू राय, गगन नारंग, अपूर्वी चंडेला आणि अभिनव बिंद्रा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये अभिनव सहभागी झाल्यास, तर ही त्याची सलग पाचवी ऑलिम्पिकवारी (सिडनी, अथेन्स, बीजिंग, लंडन, रिओ) असणार आहे.
गेल्या वर्षी ग्रॅनडा, स्पेन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर फ्री पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावत जितू रायने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला नेमबाजपटू ठरला होता. यानंतर युवा अपूर्वी चंडेलाने गेल्या महिन्यात चांगवोन, कोरिया येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. या पदकासह अपूर्वीची रिओवारी पक्की झाली. काही दिवसांपूर्वी फोर्ट बेनिंग, अमेरिका येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात गगन नारंगने ५० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले होते.