राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने सात पदकांची कमाई केल्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी पदकांचा ओझ कायम राखला. शेवटची राष्ट्रकुल स्पर्धा खेळणारा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्णपदकावर नाव कोरत भारताच्या खात्यात तिसऱ्या सुवर्णपदकाची भर घातली. नेमबाजीत मलाइका गोयल हिने रौप्यपदकावर तर वेटलिफ्टिंगमध्ये संतोषी मत्सा हिने कांस्यपदकावर नाव कोरत भारतासाठी दुसरा दिवस संस्मरणीय ठरवला.
काही दिवसांपूर्वीच माझी अखेरची राष्ट्रकुल स्पर्धा आहे, असे सांगत निवृत्तीचे संकेत देणारा भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सुवर्णपदकावर नाव कोरले. बिंद्राने अखेरच्या क्षणी कामगिरी उंचावत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.  
२००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या बिंद्राने २०५.३ गुणांची कमाई करून सुवर्णवेध घेतला. बिंद्राचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. यापूर्वी त्याने मँचेस्टर (२००२), मेलबर्न (२००६) आणि नवी दिल्लीत (२०१०) घरच्या चाहत्यांसमोर सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.
अंतिम फेरीत बिंद्राने पहिल्या दोन प्रयत्नांत चांगला वेध घेतला. या आघाडीच्या बळावरच त्याने बांगलादेशचा अब्दुल्ला बाकी आणि इंग्लंडचा डॅनियल रिव्हर्स यांचे आव्हान मोडीत काढत सुवर्णपदकाला गवसणी घातली. अब्दुल्ला बाकी याला २०२.१ गुणांसह रौप्यपदकावर तर रिव्हर्सला १८२.४ गुणांसह समाधान मानावे लागले. भारताच्या रवी कुमारला मात्र चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याने १६२.४ गुणांसह त्याने चौथे स्थान पटकावले.
सुखेनला सुवर्ण, गणेश माळीला कांस्य
भारतीय वेटलिफ्टर्सनी पहिल्या दिवशी सहापैकी चार पदकांची कमाई केली. पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात सुखेन डे याने सुवर्ण, तर गणेश माळीने कांस्यपदकावर नाव कोरले. २६ वर्षीय सुखेनने एकूण २४८ किलो वजन उचलत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. क्लीन आणि जर्क प्रकारात १०९ किलो वजन उचलल्यानंतर त्याने त्यानंतर १३९ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. २१ वर्षीय गणेश स्नॅच प्रकारानंतर आघाडीवर होता. पण क्लीन आणि जर्क प्रकारात पिछाडीवर पडल्याने त्याला एकूण २४४ किलो वजनासह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
मलाइकाला रौप्य
मलाइका गोयल या १६ वर्षीय नेमबाजपटूने राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात जेतेपदासाठी दावेदार समजली जाणारी हीना सिद्धू अपयशी ठरल्यानंतर मलाइकाने मात्र भारताच्या खात्यात रौप्यपदकाची भर घातली. मलाइकाने १९७.१ गुण मिळवत रौप्यपदकाचा वेध घेतला. तिचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक ठरले. बॅरी बुडॉन शूटिंग सेंटरवर झालेल्या अटीतटीच्या लढतीत सिंगापूरच्या शून झाय टेओ हिने १९८.६ गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. कॅनडाच्या डोरोथी लडविग हिने कांस्यपदक पटकावले. पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या हिना सिद्धूला अंतिम फेरीत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
टेबल टेनिस, बॅडमिंटनमध्ये विजय
भारतीय टेबल टेनिसपटूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखले आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघांनी शुक्रवारी अनुक्रमे गयाना आणि केनियावर ३-० अशा फरकाने सहज विजयाची नोंद केली. बॅडमिंटनमध्ये भारताने घाना, युगांडापाठोपाठ केनियाचा ५-० असा धुव्वा उडवला. किदम्बी श्रीकांत-ज्वाला गट्टा जोडीसह पारुपल्ली कश्यप, पी. सी. तुलसी, आरएमव्ही गुरुसाईदत्त-प्रणव चोप्रा तसेच सिंधू-गट्टा जोडीने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.
संतोषी मत्साला कांस्यपदक
आंध्र प्रदेशच्या २० वर्षीय संतोषी मत्साने वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. वेटलिफ्टिंग खेळात भारताला मिळालेले हे पाचवे पदक आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळाले आहे. संतोषीने स्नॅच आणि क्लिन आणि जर्क प्रकारात मिळून १८८ किलो वजन उचलले आणि कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या स्वाती सिंगने १८३ किलो वजन उचलले. मात्र तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
संदीप शेजवळचे आव्हान कायम
भारताच्या संदीप शेजवळने जलतरणात शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत उपांत्य फेरी गाठली. जलतरणात उपांत्य फेरी गाठणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. संदीपने हे अंतर एक मिनिट २.९७ सेकंदात पार करत बाराव्या क्रमांकाने उपांत्य फेरी गाठली. भारताच्या साजन प्रकाश याला मात्र दोनशे मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. पात्रता फेरीत त्याला २२ वे स्थान मिळाले. हे अंतर त्याने एक मिनिट ५३.८२ सेकंदात पूर्ण केले.