इराणचे संघटक अमिर बायात यांचे मत

शरीरसौष्ठवपटूंसाठी योग्य प्रकारे कार्यक्रमाची आखणी झाल्यास पुढील पाच वर्षांत भारत या खेळातील अव्वल राष्ट्रांपैकी एक म्हणून गणला जाऊ शकतो, असे मत जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे उपाध्यक्ष आणि इराण शरीरसौष्ठव महासंघाचे अध्यक्ष अमिर बायात यांनी व्यक्त केले.

‘‘मी गेल्या काही वर्षांत भारतातील शरीरसौष्ठवपटूंचे निरीक्षण करतो आहे. काही जणांची शरीररचना निसर्गत: उत्तम आहे; परंतु चार वर्षांपूर्वी भारताचे या खेळातील चित्र फारसे चांगले नव्हते. संघ नसल्याने एखाद-दुसरा खेळाडू सहभागी व्हायचा; पण आता परिस्थिती बदलली आहे. आता शरीरसौष्ठवपटूंचे मोठे पथक सहभागी होऊन पदकेही जिंकतात,’’ अशा शब्दांत बायात यांनी भारतीय शरीरसौष्ठवपटूंचे विश्लेषण केले. यंदाच्या जागतिक शरीरसौष्ठव महासंघाच्या परिषदेत आम्ही शरीरसौष्ठवपटूला घडवणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले, त्याला सर्वानी दाद दिली, असे त्यांनी सांगितले. इराणी खेळाडूंचे वर्चस्व आणि खेळाबाबतची स्थिती याबाबत बायात यांच्याशी केलेली खास बातचीत-

  • शरीरसौष्ठव खेळातील इराणी खेळाडूंच्या वर्चस्वाचे रहस्य काय आहे?

नैसर्गिक देणगीमुळे इराणमधील माणसे सुदृढ शरीररचनेची असतात. त्यामुळे ५५, ६० आणि ६५ किलो वजनी गटांत इराणी खेळाडू तुम्हाला दिसणे कठीण आहे. याचप्रमाणे ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’ हा किताब वरच्या गटांमधील खेळाडूच मिळवतो. त्यामुळे इराणी खेळाडूंमधील शारीरिक देणगी शरीरसौष्ठवमध्ये यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.

  • शरीरसौष्ठव आणि तंदुरुस्तीकडे देशात कशा रीतीने पाहिले जाते?

इराणमध्ये येथील शरीरसौष्ठवपटूंसाठी व्यवस्थित कार्यक्रम आखला जातो. आमच्या देशात किमान १०० व्यावसायिक दर्जाचे निष्णात प्रशिक्षक आहेत. देशातील अनेक जण अमिरातीमध्ये मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय आहार आणि खुराक हा यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. खेळाडूंची संख्या अधिक असल्याने कोणत्याही खेळाडूचे एकछत्री वर्चस्व दिसत नाही. नवनवी गुणवत्ता नित्यनेमाने उपलब्ध होते.

  • उत्तेजक पदार्थापासून खेळाडूंना दूर ठेवण्यासाठी कोणत्या योजना आखल्या जातात?

काही वर्षांपूर्वी इराणचे बरेचसे खेळाडू उत्तेजक पदार्थाच्या सेवनप्रकरणी दोषी आढळायचे, कारण त्यांच्यात आहार आणि खुराक याबाबत अज्ञान होते; परंतु आता खेळाडूंना उत्तेजकांपासून दूर ठेवण्यासाठी उत्तम कार्यक्रम अस्तित्वात आहे.

  • भारतात अभिनेत्यांच्या शरीरयष्टीकडे पाहून व्यायामशाळेत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इराणमध्ये अशी चित्रपट ताऱ्यांची भुरळ तरुणांवर पडते काय?

मुळीच नाही. इराणमध्ये प्रत्येकाला आपल्याला चांगले शरीर लाभले आहे आणि त्याची व्यवस्थित जोपासना करणे आवश्यक आहे, याची पुरती जाणीव असते. अरनॉल्ड श्वार्झेनेगर याच्या शरीरसंपदेचा मात्र जरूर आदर्श ठेवला जातो.

  • इराणमध्ये सरकारी पातळीवर कशा प्रकारे प्रोत्साहन मिळते?

आमच्या देशात दोन संघटना कार्यरत आहेत. या दोन्ही संघटनांना दोन स्वतंत्र जागतिक संघटनांची मान्यता आहे. त्यामुळे खेळाचे अतिशय नुकसान झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्पध्रेत खेळाडू स्वखर्चाने किंवा पुरस्कर्त्यांच्या पाठबळावर येथे आले आहेत. सरकारी नोकरीची कोणतीही व्यवस्था नसल्याने प्रशिक्षक होणे, हाच एक पर्याय त्यांच्यापुढे उरतो.

  • बऱ्याचशा खेळांमध्ये हिजाब परिधान करून इराणी महिला कर्तृत्व दाखवत आहेत. शरीरसौष्ठव किंवा तंदुरुस्तीकडे त्या कशा पाहतात?

इराणी महिलांना जसे सौंदर्याचे नैसर्गिक वरदान लाभलेले असते, तसेच उत्तम शरीरसंपदेचेही. इस्लामिक धर्मरचनेनुसार इराणमधील महिलांवर काही बंधने आहेत. त्यामुळे शरीरसौष्ठव या खेळात त्या सहभागी होऊ शकत नाहीत. मात्र तंदुरुस्तीची त्यांना उत्तम जाणीव आहे. त्या मोठय़ा प्रमाणात व्यायामशाळांमध्ये जातात. महिलांच्या आणि पुरुषांच्या काही स्वतंत्र व्यायामशाळा आहेत, तर काही ठिकाणी वेळा वेगवेगळ्या असतात. महिलांच्या तंदुरुस्तीसाठीसुद्धा योग्य कार्यक्रम अस्तित्वात आहे.