जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेले नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदांवर हुकूमत सिद्ध करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. वर्षांतील शेवटची ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत जोकोव्हिच आणि सेरेना यांना जेतेपदासाठी जोरदार संघर्ष करावा लागणार आहे.

फ्रेंच खुल्या स्पर्धेत जोकोव्हिचने मरेलाच नमवत जेतेपदाला गवसणी घातली होती. या पराभवातून बोध घेत मरेने विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यापाठोपाठ त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदकावरही नाव कोरले. कारकीर्दीत भन्नाट सूर गवसलेला मरे जोकोव्हिचच्या सद्दीला कडवी टक्कर देऊ शकतो. सिनसिनाटी स्पर्धेत मरेला सलग २२ विजयानंतर पराभवाला सामोरे जावे लागले. मारिन चिलीचच्या शानदार खेळासमोर तो निष्प्रभ ठरला. मात्र तरीही अमेरिकन खुल्या स्पर्धेचे दुसरे जेतेपद नावावर करण्यासाठी मरे आतुर आहे. २९ वर्षीय मरेच्या नावावर तीन ग्रॅण्ड स्लॅम आहेत. यंदाच्या वर्षांतील तिन्ही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीत मरे खेळला आहे. सलामीच्या लढतीत मरेची लढत ल्युकास रोसोलशी होणार आहे.

फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह कारकीर्दीत ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करणाऱ्या जोकोव्हिचला विम्बल्डन स्पर्धेत अंतिम लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. ऑलिम्पिकमध्ये तर सलामीच्या लढतीतूनच त्याला गाशा गुंडाळावा लागला. या अनपेक्षित पराभवामुळे जोकोव्हिचला अश्रू अनावर झाले होते. १२ ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या जोकोव्हिचवर अपेक्षांचे ओझे जाणवते आहे. त्याच वेळी दुखापतींनी सतावल्यामुळे त्याच्या कामगिरीतली अचूकता हरवली आहे. जोकोव्हिचची सलामीची लढत जेर्झी जॅन्कोविझशी होत आहे.

‘‘मी शंभर टक्के तंदुरुस्त नाही, मात्र तरीही सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी सज्ज आहे. गेले तीन आठवडे मनगटाच्या दुखापतीने सतावले आहे. त्यातून सावरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपचार पद्धतीचाही आधार घेतला आहे,’’ असे जोकोव्हिचने सांगितले.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे रॉजर फेडररने यंदाच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दुखापतीतून सावरत ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकांसह पुनरामगन करणारा राफेल नदाल जेतेपदासाठी शर्यतीत आहे. नदालने २०१० आणि २०१३ मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. सिनसिनाटी स्पर्धेत नदाल तिसऱ्या फेरीत पराभूत झाला आहे. नदालची पहिली लढत डेनिस इस्टोमिनशी होणार आहे.

भारताच्या साकेत मायनेनीने पात्रता फेरीचा अडथळा पार करत मुख्य फेरी गाठली आहे. कारकीर्दीत दमदार झेप घेणाऱ्या साकेतची पहिली लढत जेरी वेस्लेशी होणार आहे.

स्टॅनिसलॉस वॉवरिन्का, मिलास राओनिक, केई निशिकोरी आणि मारिन चिलीच या युवा खेळाडूंना जेतेपदासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

महिलांमध्ये सार्वकालीन महान खेळाडू सेरेना विल्यम्सवर आशा केंद्रित झाल्या आहेत. घरच्या मैदानावर विक्रमी २३वे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी सेरेना उत्सुक आहे. मात्र खांद्याच्या दुखापतीने तिला सातत्याने त्रस्त केले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतही याच दुखापतीमुळे तिला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या सातव्या जेतेपदासह मार्गारेट कोर्ट यांच्या २४ ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाच्या जवळ जाण्यासाठी सेरेना प्रयत्नशील आहे.

खांद्याच्या दुखापतीमुळे सिनसिनाटी स्पर्धेतून सेरेनाने माघार घेतली होती. दुखापतीच्या स्वरूपावर सेरेनाची स्पर्धेतली वाटचाल अवलंबून आहे. सलामीच्या लढतीत सेरेनासमोर एकाटेरिना माकारोव्हाचे आव्हान आहे. सातत्यपूर्ण प्रदर्शन करणारी अँजेलिक कर्बर जेतेपदाच्या शर्यतीत आहे.