अँडी मरेवर मिस्चा झरेव्हचा धक्कादायक विजय; फेडरर, वावरिंका, त्सोंगाची आगेकूच; गतविजेत्या कर्बरचा पराभव

राफेल नदालला विजयासाठी संघर्ष करायला लावणारा अलेक्झांडर झरेव्ह त्याचा भाऊ मिस्चाचा सामना पाहण्यासाठी  आला होता. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेत जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला अँडी मरे आणि अलेक्झांडरचा भाऊ मिस्चा झरेव्ह यांच्यामध्ये कडवी झुंज झाली. मिस्चा हा सामना जिंकेल, असे कुणालाही वाटले नसावे. पण त्याने दमदार खेळ करत साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चौथ्या सेटमध्ये मॅच पॉइंट मिळवल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या मिस्चाचा भाऊ अलेक्झांडरने ‘यू डन इट ब्रो..’ अर्थात जिंकलंस भावा.. असे विजयी उद्गार काढले. अलेक्झांडरने शनिवारी झालेल्या लढतीत राफेल नदालला कडवी झुंज दिली होती, परंतु त्याचे विजयात रूपांतर करण्यात त्याला अपयश आले होते. रविवारी झालेल्या इतर लढतीत रॉजर फेडरर, स्टॅनिस्लॉस वावरिंका, जो-विल्फ्रीड त्सोंगा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत गतविजेत्या अँजेलिक कर्बरला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.

रॉजर फेडररचा झंझावात

स्पध्रेतील वयोवृद्ध खेळाडू असलेल्या रॉजर फेडररने लौकिकास साजेसा खेळ करताना जपानच्या केई निशिकोरीवर ३ तास २३ मिनिटांच्या लढतीत ६-७ (४-७), ६-४, ६-१, ४-६, ६-३ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. फेडररची ग्रँडस्लॅम स्पध्रेतील ही ४९वी उपांत्यपूर्व फेरीतील वाटचाल आहे. १७ ग्रँडस्लॅम नावावर असलेल्या फेडररने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेत १३व्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. चौथ्या मानांकित स्वित्र्झलडच्या स्टान वावरिंकाने ७-६ (७-२), ७-६ (७-६), ७-६ (७-४) अशा फरकाने इटलीच्या अँड्रीस सेप्पीवर मात केली. फ्रान्सच्या जो-विल्फ्रीड त्सोंगानेही ०-१ अशा पिछाडीवरून ब्रिटनच्या डॅनिएल इव्हान्सवर ६-७ (४-७), ६-२, ६-४, ६-४ असा विजय मिळवला.

पेस विजयी, सानिया पराभूत

भारताच्या लिएण्डर पेसने मिश्र दुहेरीत मार्टिना हिंगिससह विजयी सलामी देताना ऑस्ट्रेलियाच्या डेस्टानी एैव्हा आणि मार्क पोलमन्सवर ६-४, ६-३ अशी मात केली. महिला दुहेरीत मात्र भारताच्या सानिया मिर्झाचे आव्हान संपुष्टात आले. सानिया आणि तिची सहकारी बाबरेरा स्ट्रायकोव्हा या जोडीला जपानच्या इ होझुमी व एम. काटो यांनी ३-६, ६-२, २-६ असे एक तास ५३ मिनिटांत पराभूत केले.

  • अँडी मरेसाठी हा पराभव म्हणजे कारकीर्दीचा शेवट नसला तरी त्याच्यासाठी ही चिंतेची बाब नक्की आहे. चौथ्या फेरीचा अडथळा मरे अगदी सहज पार करेल असे वाटत होते, परंतु मिस्चाने ७-५, ५-७, ६-२, ६-४ अशा फरकाने सामना जिंकून सर्वाना अवाक् केले.
  • पराभव टाळण्यासाठी मरेने सर्वस्वी पणाला लावले होते, परंतु नेटजवळून चतुर खेळ करणाऱ्या मिस्चाला रोखण्यात त्याला अपयश आले.
  • मिस्चाला रोखण्यासाठी मरेकडे भेदक सव्‍‌र्हिस हेच एक अस्त्र शिल्लक होते. पण, प्रबळ इच्छाशक्तीने कोर्टवर उतरलेल्या मिस्चाने ते अस्त्रही निकामी ठरवले.

‘‘गरज असताना मिस्चाने अप्रतिम सव्‍‌र्हिसचा खेळ केला. विशेषत: गेममध्ये पिछाडीवर असताना. या विजयास तो पात्र आहे. अखेरच्या काही सेट्समध्ये मी पिछाडीवर होतो, परंतु पहिल्या दोन सेटमध्ये मला संधी होती. त्याचे विजयात रुपांतर करण्यात अपयशी ठरलो.   – अँडी मरे

गतविजेत्या कर्बरचे आव्हान संपुष्टात

महिला एकेरीत गतविजेत्या अँजेलिक कर्बरला पराभूत करून अमेरिकेच्या कोको व्हँडेवेघेने अनपेक्षित निकाल नोंदवला. कोकोने जर्मनीच्या कर्बरवर १ तास ०८ मिनिटांत ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. रशियाच्या अ‍ॅनास्टासिया पॅव्हल्युचेंकोव्हाने रशियाच्याच स्व्हेत्लाना कुझनेस्तोव्हाविरुद्ध धक्कादायक विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अ‍ॅनास्टासियाने १ तास ८ मिनिटांत ६-३, ६-३ अशा सरळ सेटमध्ये कुझनेस्तोव्हावर मात केली. अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सने १ तास ३६ मिनिटांत ६-३, ७-५ अशा फरकाने जर्मनीच्या मोना बाथ्रेलवर, तर स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाने १ तास ५ मिनिटांत ६-२, ६-३ अशा फरकाने रोमानियाच्या सोराना सायस्र्टीवर विजय मिळवला.