भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सोशल मीडियावरील बॅटींगने अनेकांची ‘बोलंदाजी’ फोडून काढणाऱ्या वीरेंद्र सेहवागनं अनिल कुंबळे आणि विराट कोहलीच्या वादावर रोखठोक भाष्य केलं आहे. तुम्ही भारतीय प्रशिक्षकांचा अपमान कराल तर ते तुम्हाला संघाबाहेरचा रस्ता दाखवतील, असं म्हणून त्यानं कुंबळेंविषयी तक्रार करणाऱ्या टीम इंडियातील खेळाडूंना अप्रत्यक्षपणे फटकारलं आहे. यावेळी त्यानं सध्याचा कुंबळे-विराट वाद, प्रशिक्षकपदासाठी केलेला दोन ओळींचा अर्ज, भारतीय-विेदेशी प्रशिक्षक यांच्यातील फरक, प्रशिक्षक आणि खेळाडूंमधील संवाद आदी मुद्द्यांवर एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रोखठोक मतं मांडली.

संघाची कामगिरी उंचावण्यासाठी प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये संवाद आणि त्यांच्यातील चांगले संबंध खूपच महत्त्वाचे आहेत, असं सेहवाग म्हणाला. प्रशिक्षकानं खेळाडूंमधील कमतरता, उणिवा समजून घ्याव्यात आणि खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी त्यावर काम करावं. या दोघांमधील संबंध चांगले असावेत. एकमेकांबद्दल विश्वास असावा. एखाद्या मुद्द्यावर अथवा एकमेकांबद्दल झालेली चर्चा दोघांनीही खासगी ठेवावी. ती कोणत्याही परिस्थितीत इतरांशी शेअर केली जाऊ नये, असं मतही सेहवागनं व्यक्त केलं. यावेळी सेहवागनं कुंबळेचं कौतुकही केलं. अनिल कुंबळेच्या नेतृत्त्वाखाली मी खेळलो आहे. त्यानेच मला पुनरागमनाची संधी दिली आहे. कुंबळेची प्रशिक्षणाची पद्धत कशी आहे, हे मला माहित नाही. त्याच्या कार्यपद्धतीबद्दल मी अधिक सांगू शकत नाही. पण त्यानं संघासाठी दिलेलं योगदान आणि त्याच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात टीम इंडियानं केलेली कामगिरी पाहता तशी कामगिरी एखाद्यालाच जमू शकते, असं त्यानं सांगितलं. विदेशी प्रशिक्षकाबाबतही त्यानं आपली मते मांडली. विदेशी प्रशिक्षक असेल तर तो एकाच भाषेत आपल्याशी संवाद साधतो. त्यामुळं प्रशिक्षक आणि खेळाडूंमधील संवादाला कुठेतरी मर्यादा येते. तुम्हाला त्याच्याशी काही बोलायचं, सांगायचं झाल्यास फक्त एकाच भाषेत बोलता येतं. त्यामुळं जर एखाद्या खेळाडूला इंग्रजी भाषा चांगली बोलता येत नसेल तर त्याला काही सूचवायचं असलं तरी तो अधिक चांगल्या पद्धतीनं सांगू शकत नाही. पण तेच भारतीय प्रशिक्षक असेल तर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं सांगता येईल. दोघांमधील संवाद चांगल्या प्रकारे होईल, असं त्यानं सांगितलं. पाकिस्तानसोबत खेळताना मजा येते. त्यांच्या गोलंदाजांची धुलाई करायला खूप आवडत असे. विशेषतः समोर रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तर असेल तर फलंदाजी करण्याची मजा काही औरच असायची, अशी आठवणही त्यानं सांगितली.