क्रिकेटच्या पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानात खेळणे हे प्रत्येक क्रिकेटर्सचे स्वप्न असते. मग हे मैदान मारल्यानंतर त्याचे क्रिकेटमधील जगणंच सार्थक होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतीय संघाच्या फलंदाजांचे कंबरेड मोडून इंग्लंडला विजयी पताका फडकवण्याात इंग्लंडच्या अन्या श्रुबसोलेने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. या सामन्यात तिने ४६ धावांत ६ बळी टिपले. श्रुबसोलेने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी लॉर्डच्या सीमारेषेवरुन विश्वचषक विजयाचे स्वप्न पाहिले होते. तिचे वडील इयान श्रुबसोले यांनी १६ वर्षापूर्वीचा अन्याचा एक फोटो ट्विट करत लेकीने स्वप्नपूर्ण केल्याचे म्हटले आहे. इयान इंग्लंडच्या संघाकडून दोनवेळा लॉर्डसच्या मैदानावर उतरले. परंतू त्यांना हे स्वप्नपूर्ण करता आले नव्हते.

इन स्विंग आणि आऊट स्विंगची जादूगार म्हणून ओळखली जाणाऱ्या इंग्लंडच्या श्रुबसोलेने लॉर्डच्या मैदानावर पुन्हा एकदा इंग्ंलडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात भारताच्या मुख्य फलंदाजीला सुरुंग लावत भारताच्या बाजूने झुकलेला सामना तिने इंग्लंडच्या बाजूने खेचून आणला. या सामन्यात भारताचा निम्म्याहून अधिक संघ गारद करुन ती इंग्लंडसाठी ‘बाहुबली’ ठरली. विशेष म्हणजे उपांत्य सामन्यातही तिने लक्षवेधी कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या रंगतदार सामन्यात तीन चेंडूत तीन धावांची आवश्यकता असताना श्रुबसोलेने चौकार खेचून इंग्लंडला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला होता. अंतिम सामन्यातील तिच्या खेळाबद्दल बोलायचे तर सामन्याच्या सुरुवातीला तिने भारताची सलामीवीर मंधानाला तंबूचा रस्ता दाखवला. मंधानाला, झुलन गोस्वामी आणि राजश्री गायकवाडला तिने खातेही उघडण्याची संधी दिली नाही. त्यानंतर पुनम राऊत (८६), धडाकेबाज फलंदाज वेदा कृष्णमुर्ती (३५), दिप्ती शर्मा (१४) यांना बाद करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यातील विजयातील टर्निंग पॉईंटबद्दल अन्या म्हणाली की, आम्हाला सामन्यात परतणे फारच कठिण होते. नुसती धावसंख्या वाढवून उपयोग नव्हता. तर आम्हाल विकेट्स घेणे महत्त्वाचे होते. अॅलेक्सने हरमनप्रीतला बाद केल्यानंतर आमच्यात पुन्हा बळ आले. त्यामुळेच आमचा विजयाचा मार्ग सुकर झाला.