अ‍ॅलेक्सी सांचेझच्या दोन गोलच्या बळावर आर्सेनेल संघाने मंगळवारी इंग्लिश प्रीमिअर लीगच्या लढतीत दुबळ्या हल सिटी संघावर ३-१ असा विजय मिळवला. या विजयाबरोबर आर्सेनलने सलग १८व्यांदा या स्पध्रेत अव्वल चार संघांत राहण्याचा मान मिळवला आहे. आर्सेनेलने ३४ सामन्यांत ७० गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे.
आर्सेने वेंगरच्या या संघाने पहिल्या डावातच तीन गोल करून आपला विजय निश्चित केला होता. सांचेझच्या दोन गोल्सला अ‍ॅरॉन रॅमसेय याच्या एका गोलची साथ मिळाली. या विजयामुळे आर्सेनेलने पाचव्या स्थानावर असलेल्या लिव्हरपूल संघाशी ९ गुणांची आघाडी घेतली आहे. लिव्हरपूलच्या तीन लढती शिल्लक असून आर्सेनेलने गोल फरकाच्या बळावर अव्वल चारमध्ये जागा पक्की केली आणि चॅम्पियन्स लीगसाठीही पात्रता मिळवली.
सामन्याच्या २८व्या मिनिटाला सांचेझने पहिला गोल करून आर्सेनेलला आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ ३३व्या मिनिटाला सँटी काझोर्लाच्या पासवर रॅमसेयने अप्रतिम गोल करून ही आघाडी २-० अशी भक्कम केली. मध्यंतराच्या अतिरिक्त वेळेत पुन्हा सांचेझने रॅमसेयच्या पासवर गोल केला आणि आर्सनलचा मध्यंतराला ३-० अशा आघाडीवर ठेवले. मध्यंतरानंतर आर्सेनलने बचावात्मक खेळ केला. त्याचा फायदा उचलत ५६व्या मिनिटाला हल सिटीकडून स्टीफन क्युईनने गोल करून गोलफरक कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला इतर सहकाऱ्यांकडून साथ न मिळाल्याने हल सिटीला अखेपर्यंत एकाच गोलवर समाधान मानावे लागले. आर्सेनेलने ३-१ अशा फरकाने विजय निश्चित केला.