आंतरराष्ट्रीय स्तरावर जितू रायची धडाकेबाज कामगिरी सुरूच आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरल्यानंतर जितू रायने राष्ट्रकुल आणि आता आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ५० मीटर पिस्तूल प्रकारात वर्चस्व गाजवले आहे. श्वेता चौधरी हिने सर्व अडचणींवर मात करून कांस्यपदकाला गवसणी घालत आशियाई स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताचे खाते खोलले होते.
दोन वेळा ऑलिम्पिक विजेता जिन जोंगहो आणि व्हिएतनामचा युगेन होएंग फुआँग या एकापेक्षा एक मातब्बर प्रतिस्पध्र्याचा पाडाव करत सेनादलाच्या जितूने सुवर्णपदकावर ठसा उमटवला. अंतिम फेरीत युगेन जितू रायपेक्षा आघाडीवर होता. पण जितूने अखेरच्या प्रयत्नांत ८.४ गुणांची कमाई करत १८६.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. शेवटच्या प्रयत्नांत ५.८ अशी खराब कामगिरी करणाऱ्या युगेनला १८३.४ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या वँग झिवेई याने १६५.६ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले. आशियाई स्पर्धेत पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावणारा जितू राय हा जसपाल राणानंतरचा दुसरा नेमबाज ठरला आहे. याच गटात ओम प्रकाश (५५५ गुण) आणि ओंकार सिंग (५५१) यांनी अनुक्रमे १०वे आणि १६वे स्थान पटकावल्यामुळे भारताला सांघिक गटात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
प्रवासाचे व्यग्र वेळापत्रक आणि स्वत:ची बंदुक कोरियाच्या सीमा शुल्क विभागाने जप्त केल्यानंतरही फरिदाबादच्या श्वेताने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले. पात्रता फेरीत ३८३ गुणांची कमाई केल्यानंतर श्वेताने अंतिम फेरीत बलाढय़ प्रतिस्पध्र्यासमोर शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले. त्यानंतर १७६.४ गुण मिळवत तिने कांस्यपदक पटकावले. चीनच्या झँग मेंगयानने २०२.२ गुणांसह सुवर्ण तर दक्षिण कोरियाच्या जंग जी-हे हिन २०१.३ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले. श्वेताची सहकारी हिना सिद्धू (३७८) आणि मलायका गोएल (३७३) यांना पात्रता फेरीत अनुक्रमे १३व्या आणि २४व्या क्रमांकावर मजल मारता आली. आशियाई स्पर्धेत भारतीयांसाठी पहिला दिवस गाजवला तो नेमबाजांनी. श्वेता चौधरी हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात
कांस्यपदक पटकावत पदकांचे खाते खोलल्यानंतर जितू राय याने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
पुरुष पराभूत झाल्यानंतर महिला बॅडमिंटनपटूंनी २८ वर्षांचा दुष्काळ संपवत पदक निश्चित केले.
कल्पनाचे पदक हुकले
ज्युदो
ज्युदोपटू थोडाम कल्पना देवी हिला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. ५२ किलो वजनी गटातील रिपिचेज लढतीत कल्पनाला कझाकस्तानच्या लेनारिया मिंगाझोव्हा हिच्याकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे कांस्यपदक पटकावण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. अन्य ज्युदोपटूंनी पहिल्या दिवशी निराशा केली. नवदीप चाना (६० किलो) आणि लिकमाबाम सुशीला देवी (४८ किलो) यांना पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. कल्पनाने नेपाळच्या देविका खडका हिच्याविरुद्धची उपउपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकल्यानंतर तिला चीनच्या मा यिंगयान हिच्याकडून पराभूत व्हावे लागले. रिपिचेज लढतीत तिने तैवानच्या जू पाय लिएन हिचा अडथळा पार केला. पण कांस्यपदकासाठीच्या सामन्यात तिला लेनारियाकडून हार पत्करावी लागली.
महिलांमध्ये भारताचे पदक निश्चित
स्क्वॉश
भारताच्या दीपिका पल्लीकल व जोश्ना चिनप्पा यांनी स्क्वॉशमध्ये एकेरीतील सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या दोन खेळाडूंमध्येच उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार असल्यामुळे विजयी खेळाडू उपांत्य फेरीत प्रवेश करील त्याबरोबरच या खेळाडूचे किमान कांस्यपदक निश्चित होणार आहे.
जागतिक क्रमवारीत २१ वे स्थान असलेल्या चिनप्पाने स्थानिक खेळाडू सोंग सुनमी हिचा ११-९, ११-७, ११-७ असा सहज पराभव केला. पाठोपाठ बारावी मानांकित पल्लीकल हिने चीनच्या जिनयुई गुओ हिच्यावर ११-६, १०-१२, ११-६, ११-४ अशी मात केली. पल्लीकल व चिनप्पा यांनी ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील दुहेरीत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती.
याच दोन खेळाडूंना आमने सामने खेळावे लागणार हे काही दिवसांपूर्वीच निश्चित झाले होते. त्यावेळी कार्यक्रमपत्रिका तयार करताना संयोजकांनी मखलाशी केली असल्याचा आरोप चिनप्पा हिने केला होता.
बँकॉक येथे १९९८ मध्ये प्रथमच आशियाई स्पर्धामध्ये स्क्वॉशचा समावेश करण्यात आला. आतापर्यंत स्क्वॉशमध्ये भारताने चार कांस्यपदके मिळविली आहेत. त्यापैकी दोन पदके सौरव घोषाल याने मिळविली आहेत. तसेच पुरुष व महिलांच्या सांघिक विभागात भारताला प्रत्येकी एक कांस्यपदक मिळाले आहे.
विजयी बोहनी
टेनिस
टेनिसमधील महिलांच्या गटात भारताने अपेक्षेप्रमाणे तडाखेबाज प्रारंभ केला. त्यांनी ओमान संघाचा ३-० असा धुव्वा उडविला. भारताचे प्रतिनिधित्व करताना प्रार्थना ठोंबरे या महाराष्ट्राच्या खेळाडूने सराह रशीद बालुशी हिचा ६-०, ६-१ असा दणदणीत पराभव केला. तिची सहकारी व पुण्याची खेळाडू अंकिता रैना हिला मात्र फातिमा तलीब नभानी हिच्याविरुद्ध ६-४, २-६, ६-३ असा विजय मिळविताना झगडावे लागले. भारतास २-० अशी विजयी आघाडी मिळाल्यानंतर दुहेरीत नताशा पाल्हा व रिशिका सुनकारा या भारतीय जोडीस ओमानच्या खेळाडूंनी पुढे चाल दिली.   
खराब सुरुवात
वेटलिफ्टिंग
मोठय़ा कामगिरीची अपेक्षा असलेल्या भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये निराशाजनक प्रारंभ केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खुमुकचाम संजीता चानु व रौप्यपदक मिळविणाऱ्या सैखोम मीराबाई चानु यांना अनुक्रमे दहाव्या व नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मीराबाई हिने स्नॅचमध्ये ७५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९६ किलो असे एकूण १७१ किलो वजन उचलले. संजीता हिला स्नॅचमध्ये ७३ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९३ किलो असे एकूण १६६ किलो वजन उचलता आले. पुरुषांच्या ५६ किलो गटात राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता सुकेन डे यानेही सपशेल निराशा केली. चौदा स्पर्धकांमध्ये त्याला बारावा क्रमांक मिळाला. सुकेन याने स्नॅचमध्ये १०६ तर क्लीन व जर्कमध्ये १३६ असे एकूण २४२ किलो वजन उचलले.
भारताची सलामी श्रीलंकेशी
हॉकी
१६ वर्षांनंतर सुवर्णपदकाचे लक्ष्य बाळगत दक्षिण कोरियात दाखल झालेल्या भारताच्या पुरुष हॉकी संघाला ब गटातील सलामीच्या सामन्यात श्रीलंकेशी लढत द्यावी लागणार आहे. दोन वेळा सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताने श्रीलंका आणि ओमानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यास, त्यानंतर बलाढय़ प्रतिस्पध्र्याचा सामना करताना भारताचा आत्मविश्वास उंचावणार आहे. नव्या नियमांनुसार हॉकीचे सामने १५ मिनिटांच्या चार सत्रांत खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले, तर भारताला थेट रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
सायकलपटूंची निराशा
सायकलिंग
दुष्यंतला दुसरे स्थान
रोईंग
भारताच्या दुष्यंतकुमार याने पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल शर्यतीमधील प्राथमिक फेरीत दुसरे स्थान घेतले. त्याने दोन किलोमीटरचे अंतर सात मिनिटे २३.९४ सेकंदात पार केले. १५०० मीटर अंतरापर्यंत तो आघाडीवर होता मात्र शेवटच्या ५०० मीटर अंतरात दक्षिण कोरियाच्या हाकबोएम लीने जोरदार मुसंडी मारून सात मिनिटे १९.४५ सेकंदात शर्यत पूर्ण करून अव्वल स्थान प्राप्त केले.
व्हॉलीबॉलमध्ये हाँगकाँगवर विजय
भारतीय पुरुष संघाला व्हॉलिबॉलमध्ये सलामीच्या सामन्यात विजय मिळविताना बराच संघर्ष करावा लागला. त्यांनी हाँगकाँगवर ३-१ अशा सेट्सने मात केली. हा सामना भारताने २३-२५, २५-१८, २५-१६, २५-२१ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर जिंकला. भारतीय खेळाडूंनी केलेल्या चुकांमुळेच हा सामना चुरशीने खेळला गेला. भारताचा सहा फूट ९ इंच उंचीचा खेळाडू जी.आर.वैष्णव याने उत्कृष्ट बचावात्मक खेळ केला, तसेच त्याने तेरा गुण नोंदविले. प्रभाकरन व गुरिंदरसिंग यांनी प्रत्येकी १५ गुण मिळविले.
बास्केटबॉलमध्ये विजयी सलामी
बास्केटबॉलमधील पुरुष गटात भारताने साखळी सामन्यात पॅलेस्टाईन संघावर ८९-४९ अशी मात करीत झकास सलामी केली. पूर्वार्धात भारताने ४०-२३ अशी आघाडी घेतली होती. भारताच्या विजयात अमज्योतसिंग याने केलेल्या २५ गुणांचा मोठा वाटा होता. तिसऱ्या डावात भारताने ६८-४१ अशी आघाडी होती. शेवटच्या डावात भारतीय खेळाडूंनी पॅलेस्टाईन संघाचा बचाव निष्प्रभ करीत सहज विजय मिळविला. भारताची पुढच्या साखळी सामन्यात सौदी अरेबियाशी गाठ पडणार आहे.

माझे पिस्तूल सीमाशुल्क विभागाकडे अडकले होते. कोरियाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सकाळी आठ वाजता मला माझे पिस्तूल मिळाले. मात्र त्याचवेळी स्पर्धा सुरू झाल्याने मला दुसऱ्याच पिस्तूलाने खेळावे लागले. नव्या पदकासह खेळण्याचा सराव नसतानाही पदक जिंकू शकले याचा आनंद आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मी लौकिलाला साजेशी कामगिरी करू शकले नाही.
श्वेता चौधरी, नेमबाज

माझ्यावर दडपण असल्यामुळे हे सुवर्णपदक जिंकण्याची माझी इच्छा होती. जागतिक अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षाही खडतर आव्हानाला मला सामोरे जावे लागले. पण अखेरीस चांगली कामगिरी करून सुवर्णपदकावर मोहोर उमटवल्याचा आनंद होत आहे.
जितू राय, नेमबाज