‘बार्मी-आर्मी’ क्रिकेट जगतासाठी नवी नाही. इंग्लंडचे सामने जगभरात जिथे होतात, तिथे हे क्रिकेटप्रेमी आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी जातात. वानखेडेवर इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यासाठीही त्यांनी हजेरी लावली आहे. पण येथील खासगी सुरक्षारक्षकांमुळे या ‘बार्मी-आर्मी’च्या मावळ्यांना स्टेडियमला प्रदक्षिणा घालावी लागली.

‘बार्मी-आर्मी’मधील चाहते वानखेडेवरील सचिन तेंडुलकर स्टँडमध्ये सामना पाहण्यासाठी बसले होते. त्यांना मुंबईतील खाऊ गल्लीतील चटकदार आणि चमचमीत पदार्थाची भुरळ पाडली. त्यामुळे उपाहाराच्या वेळी ते सारे नॅशनल क्रिकेट क्लबजवळील खाऊ गल्लीमध्ये जाण्यासाठी निघाले. त्या वेळी त्यांना तेथील खासगी सुरक्षारक्षकाने थांबवले. त्यांना प्रवेशद्वार क्रमांक चारवरून जायला दिले नाही आणि त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर या सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशद्वार क्रमांक सहावरून जायला सांगितले.

खाऊ गल्लीमध्ये पदार्थ्यांचा आस्वाद घेऊन हे ‘बार्मी-आर्मी’चे शिलेदार मैदानात परतले तर त्यांना प्रवेशद्वार क्रमांक सहावरून प्रवेश नाकारला. त्या वेळी त्यांनी उपाहारापूर्वी घडलेला प्रसंग सांगितला. पण सुरक्षारक्षक त्यांचे ऐकायला कबूलच नव्हते. त्यांनी या शिलेदारांना प्रवेश नाकारला. त्या वेळी दोन्ही गटांमध्ये वादविवादही झाला, पण सुरक्षारक्षकांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. सुरक्षारक्षक आपले काहीच ऐकत नाही, हे समजल्यावर त्यांनी प्रवेशद्वार क्रमांक चारला जाण्याचा मार्ग विचारला. वानखेडेवरील प्रवेशद्वार क्रमांक सहा हे चर्चगेट स्टेशनजवळ आहे, तर प्रवेशद्वार क्रमांक चार हे मरिन लाइन्स रेल्वेस्थानकानजीक विद्यापीठ क्रीडा संकुलाच्या बाजूला आहे. त्यामुळे या ‘बार्मी-आर्मी’च्या चमूला वानखेडेची चांगलीच प्रदक्षिणा घडली.

याबाबत ‘बार्मी-आर्मी’चे स्टीव्ह मिलर म्हणाले, ‘‘आम्हाला पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियमवर असा वाईट अनुभव आला आहे. यापूर्वी आमच्याबाबतीत यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. उपाहारामध्ये आम्ही खाऊ गल्लीमध्ये काही पदार्थ खाण्यासाठी निघालो. त्या वेळी सुरक्षारक्षकांनी आम्हाला आमच्या प्रवेशद्वारातून जाऊ दिले नाही. त्यांनी आमची दिशाभूल करत सहा क्रमांकाच्या प्रवेशद्वाराने जाण्यास सांगितले. आम्ही जेव्हा जेवून प्रवेशद्वार क्रमांक सहावर परतलो, तेव्हा त्यांनी आम्हाला स्टेडियममध्ये सोडले नाही. सुरक्षारक्षकांच्या या विसंवादाचा फटका आम्हाला बसला. त्यानंतर आम्हाला स्टेडियममध्ये जाण्यासाठी जवळपास अर्धा तास लागला. यापुढे असा त्रास होऊ नये, यासाठी आम्ही ही गोष्ट मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कानावर घालणार आहोत.’’