भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महिला क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (डब्ल्यूसीएएआय) मानद महासचिव नूतन गावस्कर यांनी केला आहे. गेल्या आठ वर्षांपासून महिला क्रिकेट बीसीसीआयच्या अखत्यारीमध्ये आले असले तरी महिलांना न्याय मिळत नसल्याचे गावस्कर यांचे म्हणणे आहे.
‘‘२००६ मध्ये डब्ल्यूसीएएआयचे बीसीसीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आले. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतामध्ये पाहणी पथक पाहून बीसीसीआय त्यांच्या नियमांचे पालन करीत आहे की नाही ते पाहावे,’’ असे गावस्कर यांनी म्हटले आहे.
गावस्कर यांच्या मते देशामध्ये चांगली गुणवत्ता आहे. देशामध्ये नक्कीच १० युवा गुणवान मुली असतील, पण बीसीसीआय फक्त २४ मुलींचाच विचार करीत आहे.
‘‘महिलांचे क्रिकेट प्रसिद्ध होण्यासाठी त्यांच्यासाठी आयपीएलसारखी स्पर्धा भरवायला हवी. पहिल्या वर्षी फक्त भारतीय महिला क्रिकेटपटूंना प्रवेश द्यावा आणि त्यानंतर परदेशी खेळाडूंना संधी देण्यात यावी. आम्ही या गोष्टीचा गांभीर्याने विचार करीत असून सध्या प्रायोजकाच्या शोधात आहोत,’’ असे गावस्कर म्हणाल्या.