भारताचा राष्ट्रीय विजेता अभिजित गुप्ता याने युक्रेनच्या युरिये कुझुबोव्ह याला बरोबरीत रोखले आणि दुबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील सातव्या फेरीअखेर संयुक्त दुसरे स्थान राखले. गुप्ता याने सेबॅस्टीयन बोगनर (स्वित्र्झलड), अनौर इस्मागेम्बेतोव्ह (कझाकिस्तान) यांच्या साथीत दुसरे स्थान घेतले आहे. त्यांचे प्रत्येकी साडेपाच गुण आहेत. फ्रान्सच्या रोमेन एडवर्ड याने सहा गुणांसह आघाडीस्थान राखले आहे. त्याने बोगनर याला झटपट बरोबरीत रोखले. भारताच्या एम. शामसुंदर याने तुर्कमिनीस्तानच्या सोलाक ड्रॅगन याला बरोबरीत ठेवले. त्याचे साडेचार गुण झाले आहेत. सहज ग्रोव्हर याने मिखाईल मेश्वेदिलिश्वीली याच्याविरुद्ध अर्धा गुण स्वीकारला. त्याचेही साडेचार गुण आहेत. पुण्याच्या अभिषेक केळकर याला कझाकिस्तानच्या पाव्हेल कोत्सूर याने पराभूत केले. स्वप्नील धोपाडे या महाराष्ट्राच्या खेळाडूने फ्रेड्रिक फ्राईस या जर्मन खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविला. अनिरुद्ध देशपांडे याने अबो हझीम मोहानेद (जॉर्डन) याच्यावर मात केली.