दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी चहापानानंतर उमेश यादवने आपल्या गोलंदाजीतून अक्षरश: आग ओकली आणि पाहुण्यांच्या डावाला खिंडार पाडले. त्याच्या या स्पेलमुळे भारताने कसोटी सामना जिंकून मालिकेत ३-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. हा स्पेल कारकीर्दीतील पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास देणारा होता, असे मत यादवने व्यक्त केले.
यादवने चहापानानंतर तीन गडी बाद केले, तर सहा षटके निर्धाव टाकून आफ्रिकेवर दडपण ठेवले. या सामन्यात दुसऱ्या डावात उमेशने २१ षटकांत १६ निर्धाव षटके टाकून ९ धावांत तीन गडी बाद केले.
‘‘कसोटी कारकीर्दीत मी भारतात आणि परदेशात काही सामने खेळलो. आफ्रिकेविरुद्धच्या त्या स्पेलने माझ्यातील आत्मविश्वास वाढवला. कसोटी क्रिकेट किंवा स्थानिक क्रिकेटमधून जे काही मी शिकले, ते या स्पेलमध्ये उपयोगी आल्यासारखे वाटले,’’ असे मत यादवने व्यक्त केले.
यादवने डॅन पिटला झेलबाद केले, तर डेन व्हिलास आणि कायले अॅबोटला इनस्विंग चेंडूवर त्रिफळाचीत केले. अंतिम सत्रात तुझ्या डोक्यात कोणती खलबते सुरू होती, असे विचारताच तो म्हणाला, ‘‘दक्षिण आफ्रिकेला ३-० असे पराभूत करण्याचा हाच तो क्षण आहे. तो क्षण पुन्हा येणार नाही. एक गडी बाद केला तरी आमच्या विजयाची दारे उघडी होतील़, याची जाण होती. सर्वाना तो बळी हवा होता.’’