* डिएगो कोस्टाचा भरपाई वेळेत निर्णायक गोल *  मँचेस्टर युनायटेडविरुद्ध १-१ अशी बरोबरी
गतविजेत्या चेल्सी क्लबने प्रशिक्षक गुस हिडींक यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये (ईपीएल) अपराजित राहण्याची मालिका रविवारीही कायम राखली. स्टॅमफोर्ड ब्रिज स्टेडियमवर झालेल्या लढतीत चेल्सीने डिएगो कोस्टाने भरपाई वेळेत नोंदवलेल्या गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडला १-१ अशा बरोबरीत रोखले. ६०व्या मिनिटाला जेसे लिंगार्डच्या गोलने १-० अशा विजयी आघाडीवर असणाऱ्या युनायटेडला संपूर्ण तीन गुणांची कमाई करण्यात अपयश आले. युनायटेडच्या निराशाजनक कामगिरीवर प्रशिक्षक लुईस व्हॅन गाल यांनी नाराजी व्यक्त केली.
सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या युनायटेडने उशिरा का होईना ईपीएलमध्ये पुनरागमन केले. त्यामुळे गाल यांच्या हकालपट्टीच्या मागणीचा सूर काहीसा दबका झाला होता. मात्र, रविवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत तोंडाजवळ आलेला विजयाचा घास हिरावल्याने ही मागणी पुन्हा जोर धरू शकते. सामन्याच्या पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवत युनायटेडने अप्रतिम खेळाचा नजराणा सादर केला. मध्यंतरानंतरही सातत्य राखत त्यांनी गतविजेत्यांवर दडपण निर्माण केले होते. ६०व्या मिनिटाला १९ वर्षीय कॅमेरॉन बोर्थविक-जॅक्सनच्या पासवर व्ॉन रुनीने चेंडू गोलजाळीपासून १२ मीटरच्या अंतरावर असलेल्या लिंगार्डकडे सोपवला. लिंगार्डने हाफव्हॅलीद्वारे गोलजाळीच्या वरच्या बाजूने गोलरक्षक थिबोट कौटरेसला चकवून गोल करून युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात १-० अशी आघाडी कायम राहिल्याने युनायटेडचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, चेल्सीच्या कोस्टाने त्यांच्या विजयी आनंदावर विरजण घातले. विजयी आनंदात गाफील झालेल्या युनायटेडची बचावफळी भेदून कोस्टाने गोल करत चेल्सीचा पराभव टाळला. युनायटेडला १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.
९ : चेल्सीने सलग ९ सामन्यांत (३ विजय व ६ अनिर्णीत) अपराजित राहण्याचा विक्रम नोंदवला आहे.