कर चुकवल्याच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो रिअल माद्रिद क्लबला सोडचिठ्ठी देऊन माजी क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळणार असल्याच्या अफवांना माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी पूर्णविराम दिला. पुढील दोन-तीन वर्षे रोनाल्डो माद्रिदकडूनच खेळणार आहे, असे झिदान यांनी रविवारी जाहीर केले.

पूर्व हंगामी मैत्रीपूर्ण लढतीत रिअल माद्रिद सोमवारी मँचेस्टर युनायटेडविरुद्ध खेळणार आहे. मात्र ३२ वर्षी रोनाल्डो सुट्टीवर आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला झिदान यांना रोनाल्डोविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘‘रोनाल्डो माद्रिदला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या बऱ्याच चर्चा सध्या सुरू आहेत. पण त्याच्याशी चर्चा करताना तसे मला काही जाणवले नाही. तो सध्या सुट्टीवर आहे आणि ५ ऑगस्टला परतणार आहे. इतरांप्रमाणे त्याच्याबाबतच्या चर्चा ऐकण्याचे काम मी करत आहे. पण तो पुढील २-३ वर्षे क्लबसोबत असेल.’’