भारताचा आघाडीत फलंदाज गौतम गंभीर हा स्वार्थी असून त्याचे मैदानावरचे वर्तन चांगले नसते, अशी तक्रार कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बीसीसीआयकेडे केली आहे. नागपूर कसोटीच्या पूर्वसंध्येला टीम इंडियामधील मतभेद पुन्‍हा एकदा समोर आले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावर चहूबाजूंनी टिकेची झोड उडत असून आता कर्णधार धोनी संघातील इतर खेळाडूंना दोष देत असल्याचंच दिसून येत आहे.     
कोलकाता कसोटीत सेहवाग आणि पुजारा बाद होण्यास गंभीर कारणीभूत असल्याचा आरोप धोनीने केला आहे. आपलं संघातील स्थान कायम रहावं यासाठी गंभीरची धडपड चालू असल्याचे धोनीचे म्हणणे आहे. एका वेबसाईटने सूत्रांच्‍या हवाल्‍याने हे वृत्त दिले आहे.
यापूर्वी वीरेंद्र सेहवागवर स्‍वार्थी असल्‍याचा आरोप धोनीने केला होता. सेहवाग देशासाठी खेळत नसून त्‍याचे लक्ष आयपीएलवर आहे, असे त्याने म्‍हटले होते.  
इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी मालिकेत भारत २-१ ने पिछाडीवर आहे. नागपूर येथे उद्यापासून (गुरूवार) चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. मालिकेत पिछाडीवर असताना संघातील कुरघोड़ीसोबत भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.