ऑस्ट्रेलियाच्या ५६६ धावांच्या डोंगरासमोर खेळताना इंग्लंडची घसरगुंडी उडाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची ४ बाद ८५ अशी स्थिती आहे. इंग्लंडचा संघ ४८१ धावांनी पिछाडीवर आहे.
मिचेल स्टार्कने अ‍ॅडम लिथला शून्यावर बाद केले. मिचेल जॉन्सनने गॅरी बॅलन्सला त्रिफळाचीत केले. जोश हेझलवूडने इयान बेलला स्थिरावू दिले नाही. जॉन्सनने भरवशाच्या जो रुटला बाद करत इंग्लंडला अडचणीत टाकले. तत्पूर्वी स्टीव्हन स्मिथच्या द्विशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाचशे धावांची वेस ओलांडली. दुसऱ्या विकेटसाठी २८४ धावांच्या भागीदारीनंतर रॉजर्स बाद झाला. त्याने १७३ धावांची खेळी केली. एका बाजूने सहकारी बाद होत असताना स्मिथने संयमी खेळी केली. त्याने ३४६ चेंडूंमध्ये २५ चौकार व एक षटकारासह २१५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला. इंग्लंडतर्फे स्टुअर्ट ब्रॉडने ४ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया पहिला डाव : ८ बाद ५६६ डाव घोषित (स्टीव्हन स्मिथ २१५, ख्रिस रॉजर्स १७३, स्टुअर्ट ब्रॉड ४/८३) वि. इंग्लंड पहिला डाव : ४ बाद ८५ (बेन स्टोक्स ३८, मिचेल जॉन्सन २/१६)