इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गेल्या मोसमात लिस्टर सिटीने सर्व फुटबॉल पंडितांची भाकीते चुकवून विजेतेपदाचा चषक उंचावला होता. क्लबच्या ४५ वर्षांहून अधिक काळातील हे सर्वात मोठे यश होते. जेतेपदाच्या चषकासह लिस्टर सिटी क्लब घरी परतला, त्या वेळी खुल्या छताच्या बसमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि विमानतळ ते किंग पॉवर स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर चाहत्यांची गर्दी लोटली होती. क्लबला हे स्वप्नवत जेतेपद मिळवून देणाऱ्या क्लाऊडी रॅनिएरी यांना तर चाहत्यांनी डोक्यावर घेतले. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गेल्या मोसमाची आठवण करून देण्याचे कारण की, भारतातल्या प्रमुख स्पध्रेत म्हणजेच आय-लीगमध्ये अशाच एका क्लबने गरुडभरारी घेतली आहे. एकीकडे दहाव्या वर्षांत पदार्पण करणारी ही लीग अखेरची घटका घेत आहे. इंडियन सुपर लीगमुळे आय-लीगचे भवितव्य धोक्यात आले असताना अखेरच्या मोसमात या लीगने संपूर्ण भारताचे लक्ष वेधले आहे. ऐझॉल या उत्तर-पूर्व भारतातील शहराने आय-लीग जेतेपदावरील घेतलेली ऐतिहासिक पकड हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे.

भारताच्या नकाशावर भिंग घेऊन शोधावा लागणाऱ्या मिझोराम राज्याची राजधानी असलेल्या ऐझॉल शहराबाबत जाणून घेण्यासाठी सध्या जोरदार ‘गुगल’शोध सुरू आहे. दोन ते अडीच लाख लोकसंख्या असलेल्या या शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऐझॉल क्लबने आय-लीग जेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. मागील हंगामात गुणतालिकेत तळाला असलेल्या आणि दुसऱ्यांदा आय-लीगमध्ये सहभागी झालेल्या या क्लबच्या यशोगाथेने सर्वच चकित झाले आहे. गेल्या आठवडय़ात बलाढय़ मोहन बगान क्लबला नमवून ऐझॉल क्लबने जेतेपदाच्या उंबरठा गाठला आणि जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी त्यांना रविवारी शिलाँग लाजाँगविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यांत बरोबरीही पुरेशी आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी शिलाँग येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर यजमानांपेक्षा ऐझॉलचे चाहते अधिक प्रमाणात जमलेले पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको. उत्तर-पूर्व भारतातील आय-लीग चषक उंचावणारा तो पहिलाच क्लब ठरणार आहे.

मोहन बगान या शेजारील क्लबने सोनी नॉर्डे या प्रमुख आक्रमणपटूला आपल्या चमूत दाखल करून घेण्यासाठी दोन कोटी रुपये मोजले. नॉर्डेच्या किमतीइतका ऐझॉल क्लबचा अर्थसंकल्प आहे. त्यांनी जेतेपदाचा चषक उंचावला तर त्यांना एक कोटी म्हणजेच त्यांच्या अर्थसंकल्पाच्या निम्मी रक्कम बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. २०१५-१६च्या इंग्लिश प्रीमिअर लीगचा चषक जिंकणाऱ्या लिस्टर सिटीचा अर्थसंकल्प हा ४३५ कोटी रुपयांचा होता, तर दुसऱ्या स्थानावर आलेल्या आर्सेनलचा अर्थसंकल्प १८४५ कोटी रुपयांचा. त्यापाठोपाठ हॉटस्पूर (१३९७ कोटी) आणि मँचेस्टर सिटी (३३८८ कोटी) या अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर असलेल्या क्लबचा अर्थसंकल्प पाहिल्यास लिस्टर सिटीने घेतलेल्या उत्तुंग भरारीचे मूल्यांकन करणे सोपे जाईल. तसेच मूल्यांकन आता ऐझॉल क्लबचे करावे लागणार आहे. गेल्या मोसमात १६ सामन्यांत केवळ चार विजयांसह १६ गुणांची कमाई ऐझॉलला करता आली होती. त्यामुळे या मोसमात त्यांचा प्रवेश अनिश्चित मानला जात होता, परंतु आय-लीग आणि इंडियन सुपर लीग यांच्या विलीनीकरणाच्या वादामुळे गोव्यातील तीन क्लबनी माघार घेतली आणि ऐझॉलला संधी मिळाली.

मिझोराममधील अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याकांमध्ये शिक्षण आणि क्रीडा यांचा प्रसार करण्यासाठी १९८४ मध्ये ऐझॉल फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. रॉबर्ट रोमासिया रॉयटे यांनी २०११ साली ऐझॉल क्लबने संपूर्ण मालकत्व खरेदी केले आणि त्याचे व्यावसायिक क्लबमध्ये रूपांतर केले. ऐझॉलसाठी हे मोठे आव्हानच होते आणि ते साक्षात उतरवताना त्यांनी अवघ्या सहा वर्षांत इतिहास घडविण्याच्या दिशेने कूच केली आहे. स्थानिकांमध्ये फुटबॉलची प्रचंड आवड असलेली येथे पाहायला मिळते. खेळाडूंना नायकाप्रमाणे येथे वागणूक दिली जाते आणि आजच्या घडीला मिझोरामचे ५८ खेळाडू आय-लीगच्या दहा विविध क्लबमध्ये खेळत आहे. हैदराबाद (१९५० व ६०चे दशक) आणि मणिपूर यांच्याप्रमाणे गुणवान फुटबॉलपटू मिझोराममध्ये घडत आहेत. १९८२च्या फुटबॉल विश्वचषक स्पध्रेत येथील शिक्षक ब्राझीलचा सामना पाहण्यासाठी राज्याबाहेर पडला. दिग्गज फुटबॉलपटू झिकोचा चाहता असलेल्या या शिक्षकाने आपल्या मुलाचे नावही झिको झोरेम्सांगा असे ठेवले आणि त्याला फुटबॉल खेळण्यास प्रवृत्त केले. ९ मार्च २०१४ मध्ये याच झिकोने संतोष करंडक फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम सामन्यात रेल्वेविरुद्ध दोन गोल करून मिझोरामला ३-० असा दणदणीत विजय मिळवून दिला. उत्तर-पूर्व भारतातील राज्याने जिंकलेली ही पहिली वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा होती. मिझोरामच्या लोकांनी झिकोचे जंगी स्वागत केले आणि त्या स्वागताबरोबरच मिझोराममध्ये फुटबॉलचे आगमन झाले. रविवारी याच राज्यातील क्लब इतिहासाच्या पानांवर आपले नाव सुवर्णाक्षराने कोरण्यासाठी आतुर झाला आहे.  यश मिळवल्यास आशियाई स्पर्धामध्येही मिझोरामचा दबदबा दाखवण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

ऐझॉल क्लबची कामगिरी

  • ’डुरॅण्ड चषक २०१६ : ‘ब’ गटात सर्वाधिक १० गुणांची कमाई करत उपांत्य फेरीत प्रवेश
  • ’एमएफए सुपर चषक २०१६ : अजिंक्यपद
  • ’मिझोराम निमंत्रित फुटबॉल स्पर्धा : अजिंक्यपद
  • ’फेडरेशन चषक २०१६ : उपविजेतेपद. मोहन बगान क्लबकडून पराभूत
  • ’आय-लीग २०१५-१६ : आठव्या स्थानी (१६ सामने, १६ गुण)
  • ’मिझोराम प्रीमिअर लीग २०१५-१६ : अजिंक्यपद
  • ’एमएफए सुपर चषक २०१५ : उपविजेतेपद (बीव्हीटी एफसीकडून पराभूत)
  • ’मिझोराम निमंत्रित फुटबॉल स्पर्धा : अजिंक्यपद