आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेले आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) माजी उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांच्यावर फिफाने तहहयात बंदी घातली आहे. त्यांना यापुढे फुटबॉलच्या कोणत्याही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.
फिफाच्या नैतिक मूल्ये समितीने हा निर्णय घेतला आहे. फिफा व अन्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल संघटनांवरील विविध पदांवर काम करताना त्यांनी अनेक वेळा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आल्याचे फिफाने एका पत्रकाद्वारे जाहीर केले. वॉर्नर यांनी विविध संघटनांवर काम करताना विविध करारांपोटी, विविध कामांपोटी भरपूर माया जमवली, बेकायदेशीर व्यवहार केले, स्वत:च्या आíथक फायद्यापोटी अनेक उपक्रम हाती घेतले असेही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
त्रिनिदाद व टोबॅको देशांच्या या संघटकावर मायदेशातही अनेक खटले सुरू आहेत. या खटल्यांची सुनावणी डिसेंबरमध्ये होणार आहे. फिफामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारात त्यांचा मोठा वाटा होता असाही आरोप त्यांच्यावर आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी फिफाच्या १४ पदाधिकाऱ्यांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ठेवले आहेत. या व्यवहारात १५ कोटी डॉलर्सचा घोटाळा झाल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले होते.
उत्तर व मध्य अमेरिकन महासंघ व कॅरेबियन फुटबॉल परिषदेवर वॉर्नर यांनी विविध पदांवर काम केले आहे. तेथेही त्यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. २०१० व २०१४च्या विश्वचषक स्पर्धेबाबत थेट प्रक्षेपणाचे हक्क विकताना त्यांनी फिफाचे उपाध्यक्ष म्हणून भरपूर आर्थिक मोबदला मिळवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.