‘‘२०१८ आणि २०२२ सालच्या विश्वचषकाचे यजमानपद रशिया आणि कतार यांना देण्यात आल्यामुळे भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा कट रचला गेला. हे यजमानपद इतर देशांना मिळाले असते तर परिस्थिती वेगळी असती,’’ असा दावा फिफाचे अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी
केला. शुक्रवारी झुरीच येथे अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी भाषणात ते बोलत होते.
अमेरिका आणि स्विस पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अध्यक्षपदावरून पायउतार होण्यास ब्लाटर यांनी नकार दिला होता. २०१०मध्ये विश्वचषक आयोजनासाठी झालेल्या मतदानात रशियाला २०१८चे, तर कतारला २०२२ चे यजमानपद मिळाले होते. त्यानंतर गदारोळ माजला होता. ‘‘या दोन देशांव्यतिरिक्त इतर दोन देशांची नावे लिफाफ्यात आली असती, तर आज आपल्याला या समस्येला सामोरे जावे लागले नसते. मात्र, आपण भूतकाळात जाऊ शकत नाही. आपण भविष्यकथन करू शकत नसल्यामुळे पुढे काय होणार, हे सांगू शकत नाही.’’, असे ब्लाटर यांनी स्पष्ट केले.
२०२२च्या विश्वचषक यजमानपदाच्या शर्यतीत अमेरिकेचाही समावेश होता. याबाबत ते म्हणाले की, ‘‘सध्याची परिस्थिती पाहता त्यावर अधिक बोलायला हवे, परंतु अध्यक्षीय भाषण भरकटू शकते. या पुढे आपल्याला कसे काम करायला हवे, यावर बोलायला मला आवडेल. सध्या आपण कठीण प्रसंगातून जात आहोत. फिफावर चिखलफेक झालेली चालणार नाही. मात्र, दोषी आढळलेले व्यक्ती म्हणजे संघटना नाही. त्या व्यक्ती दिशा भरकटले आहेत. अध्यक्ष म्हणून मला ही जबाबदारी स्वीकारायला हवी. आपण आता या एका वळणावर आहोत आणि तिथून आपल्याला एकत्रितरीत्या पुढे जायला हवे.’’
ब्लाटर यांच्या भाषणादरम्यान पॅलेस्टियनच्या काही समर्थकांनी या वेळी निदर्शन केले. दोन महिलांनी झेंडे दाखवून ब्लाटर यांना भाषण करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच १५० हून अधिक निदर्शकांनी बैठकी स्थळाबाहेर निदर्शने केली.

बॉम्बची अफवा
शुक्रवारी पार पडलेल्या फिफाच्या बैठकीत बॉम्बच्या अफवेने एकच खळबळ उडवली. स्विस पोलिसांना बॉम्ब असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम राबवली; परंतु ही अफवा असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले.

इंग्लंडची विश्वचषकातून माघार?
लंडन : सेप ब्लाटर पुन्हा अध्यक्षपदावर निवडून आल्यास २०१८व्या विश्वचषक स्पध्रेवरील बहिष्काराला इंग्लंडचा पाठिंबा असेल, असे मत इंग्लंड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष ग्रेग डिक यांनी व्यक्त केले. मात्र, त्यांचा सहकारी मिचल व्ॉन प्राग यांनी अशा प्रकारची कोणतीच चर्चा न झाल्याचे स्पष्ट करून संभ्रम निर्माण केला. फिफा बैठकीपूर्वी बीसीसी रेडिओशी बोलताला डिक म्हणाले, ‘‘इंग्लंड एकटा नाही. संपूर्ण युरोपियन देश बहिष्काराच्या पवित्र्यात आहेत. संपूर्ण युरोप महासंघांनी तसा निश्चय केल्यास वावगे ठरणार नाही. केवळ एक किंवा दोन देशांनी विरोध करून चालणार नाही. फिफा त्या देशांशिवाय स्पर्धा घेतील आणि त्या देशांच्या प्रेक्षकांवर तो अन्याय असेल, परंतु यूईएफएने संघटितपणे विरोध केल्यास आमचाही त्यांना पाठिंबा असेल.’’
अमेरिकेचा प्रिन्स अली यांना पाठिंबा
लॉस अँजेलेस : फिफा अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्या विरोधातील मोहिमेत अमेरिकन सॉकर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील गुलाटी यांनी सहभाग घेतला आहे. गुलाटी यांनी अध्यक्षपदासाठी प्रिन्स अली बिन अल हुसेन यांना पाठिंबा दर्शविला आहे. ‘‘अमेरिकन सॉकर फेडरेशन प्रिन्स अली बिन अल हुसेन यांना मतदान करणार आहे. हे मतदान चांगल्या प्रशासनासाठी आणि खेळाच्या प्रगतीसाठी असेल,’’ असे ट्विट गुलाटी यांनी केले.गुलाटी हे फिफाच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य आहेत. अमेरिकन पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर ब्लाटर यांनी पदभार सोडावा़, या मागणीने जोर धरला. गुलाटी म्हणाले की, ‘‘भविष्यात अमेरिकेला विश्वचषक स्पध्रेचे आयोजन करायला आवडेल का, या प्रश्नाचे उत्तर मी होच देईन. मात्र, माझ्यासाठी आणि अमेरिकेतील फुटबॉलसाठी चांगल्या प्रशासनाची आवश्यकता आहे.’’