१७ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने सुरुवातीच्या सामन्यातच चिलीचा धुव्वा उडवला. ४-० च्या फरकाने चिलीवर मात करत इंग्लंडने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. युरोपियन पात्रता फेरीत उप-विजेते ठरलेल्या इंग्लंडने चिलीला संपूर्ण सामनाभर डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. संपूर्ण सामन्यात अर्धाहून अधिक काळ बॉलचा ताबा हा इंग्लंडच्या खेळाडूंकडे होता. त्यामुळे हा सामना काहीसा एकतर्फी झाला.

इंग्लंडच्या ओडोईने पाचव्या मिनीटाला आपल्या संघाचं खातं उघडलं. यानंतर सामन्याच्या ५१ व्या आणि ६० व्या मिनीटाला गोल झळकावत सँचोने इंग्लंडच्या विजयात मोलाचा हातभार उचलला. अखेर अँगल गोमेजने ८१ व्या मिनीटाला गोल झळकावत चिलीच्या सामन्यात पुनरागमन करण्याच्या आशा पुरत्या धुळीला मिळवल्या.

विश्वचषकासाठी दक्षिण अमेरिका प्रांतात झालेल्या पात्रता फेरीत चिलीचा संघ हा उपविजेता ठरला होता. मात्र इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात चिलीचे खेळाडू हे संभ्रमात दिसत होते. बराच वेळ इंग्लंडच्या खेळाडूंच्या आक्रमणाला कसं तोंड द्यायचं हे देखील चिलीच्या खेळाडूंना समजतं नव्हतं. संपूर्ण सामन्यात चिलीच्या खेळाडूंनी केवळ चारवेळा इंग्लडच्या गोलपोस्टवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे चारही प्रयत्न फोल ठरले. यात भर म्हणून चिलीच्या संघाचा गोलकिपर ज्युलिओ बोर्क्युझला रेफ्रींनी रेड कार्ड दाखवत संघाबाहेरचा रस्ता दाखवला.

कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडीयमवर झालेल्या या सामन्यात उपस्थित प्रेक्षकांनी इंग्लंडच्या खेळाचा मात्र चांगलाच आनंद लुटला. इंग्लंडचे प्रशिक्षक स्टिव्ह कुपर यांनी आपल्या खेळाडूंना योग्य वेळी संधी देत, आपल्या संघाचं सामन्यावर वर्चस्व कायम राहिल याची काळजी घेतली.