यजमान भारताची फुटबॉल विश्वचषकाची सुरुवात अतिशय निराशाजनक झालेली पहायला मिळाली. नवी दिल्लीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात अमेरिकेने यजमान भारताचा ३-० ने पराभव करत, फुटबॉलमध्ये भारताला आणखी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव करुन दिली. अमेरिकेकडून अँड्रू कार्लटन, ख्रिस डर्कीन आणि जोश सर्जंट यांनी गोल झळकावत आपल्या संघाचा विजय निश्चीत केला.

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघाने सामन्यात आश्वासक सुरुवात केली होती. मिडफिल्ड आणि फुलबॅकच्या पोजिशनवर खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंनी अमेरिकेच्या स्ट्राईकर्सना चांगलचं बांधून ठेवलं होतं. भारतीय खेळाडूंच्या या प्रयत्नांना गोलकिपर धीरजनेही चांगली साथ दिली. मात्र ठराविक वेळेनंतर अमेरिकेच्या खेळाडूंनी सामन्यात पुनरागमन करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या सत्रात चांगला खेळ करणाऱ्या भारतीय खेळाडूंना आपल्या चेंडुवर नियंत्रण ठेवणं कठीण जात होतं. दोन पास नंतर एकही भारतीय खेळाडू बॉलचा ताबा आपल्यापाशी ठेऊ शकत नव्हता, याचा फायदा अमेरिकेच्या खेळाडूंनी घेतला.

अखेरच्या सत्रात कोल्हापूरकर अनिकेत जाधव आणि काही खेळाडूंनी चांगल्या चाली रचत अमेरिकेच्या पेनल्टी क्षेत्रात प्रवेश मिळवला होता. मात्र समन्वयाच्या अभावामुळे त्या चालींच गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना अपयश आलं. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही भारतीय प्रशिक्षकांनी भारतीय संघाच्या दुसऱ्या सत्रातील खेळावर नाराजी व्यक्त केली. “आम्ही अमेरिकेसमोर आमच्या खेळातून आव्हान उभं करणं अपेक्षित होतं, मात्र त्या तोडीचा खेळ आम्ही केला नाही. अनेक खेळाडू पास योग्य पद्धतीने करत नव्हते, या गोष्टींचा आम्हाला फटका बसला.” त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.