विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला असताना विविध शानदार प्रदर्शनांनी गाजवलेल्या या विश्वचषक स्पर्धेला तिकीट विक्रीसंदर्भातील घोटाळ्यामुळे गालबोट लागले आहे. फिफाचे तिकीट आणि हॉस्पिटॅलिटीसाठीची जबाबदारी असणाऱ्या ‘मॅच’ कंपनीचे ब्रिटिश उच्च अधिकारी रे व्हिलॅन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तिकिटांचा कथित घोटाळ्याप्रकरणी व्हिलॅन यांना पुन्हा अटक करण्यासाठी गेलेल्या रिओ दी जानिरो पोलिसांनी ते फरार असल्याचे घोषित केले आहे.
‘मॅच’ कंपनीने व्हिलॅन फरार झाले नसल्याचे म्हटले आहे. व्हिलॅन आपल्या वकीलांसोबत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे, मात्र त्यांचा ठावठिकाणी सांगण्यास त्यांनी नकार दिला. या घोटाळ्यामुळे तसेच व्हिलॅन यांच्या संदिग्ध वर्तनामुळे फिफावर नामुष्की ओढवली आहे. फिफातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये तिकिटांचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप वारंवार केला जातो. त्या पाश्र्वभूमीवर रिओ दी जानिरो पोलीस कसून तपास करत आहेत.
एक कोटी डॉलर्स एवढय़ा प्रचंड रकमेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने व्हिलॅन यांच्यासह दहा जणांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार व्हिलॅन यांना ताब्यात घेण्यासाठी रिओ पोलिस कोपाकॅबाना पॅलेस हॉटेलात पोहोचले. मात्र त्यापूर्वीच व्हिलॅन यांनी पोबारा केल्याचे स्पष्ट झाले. मात्र ‘मॅच’ कंपनीने व्हिलॅन निर्दोष असल्याचा दावा केला आहे. मात्र गायब असल्यापासून व्हिलॅन यांच्याशी संवाद होऊ शकला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
फिफाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांच्या पुतण्याचे ‘मॅच’ या कंपनीत समभाग आहेत. या कंपनीने विश्वचषकासाठी तीन लाख हॉस्पिटॅलिटी पॅकेजेसची विक्री केली असून, या कंपनीचा फिफाशी ३०० दशलक्ष डॉलर्स एवढय़ा प्रचंड रकमेचा करार आहे. व्हीआयपी तिकीटे आणि हॉस्पिटॅलिटी पासेसच्या गैरविक्रीद्वारे घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी रिओ पोलिसांनी २२ ब्रिटिश नागरिकांना अटक केली आहे. हे सर्वजण तिकीटांची गैरविक्री करताना आढळले आहेत.