भारतीय खेळाडू आर्थिक उत्पन्नाच्या अभावी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवू शकत नाहीत, असा अनुभव आहे. त्यामुळेच त्यांना शासनातर्फे त्यांच्या कामगिरीच्या आधारे चांगल्या पगाराची नोकरी दिली जाते. मात्र अनेक वेळा खेळाडूंना या नोकरीत असा अनुभव येतो, तिथे होणाऱ्या अवहेलनेमुळे एकवेळ नोकरी नको, असेच या खेळाडूंच्या मनात येते. अलीकडे आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सी. के. विनीतला आलेला अनुभव अशा उपेक्षितांचे प्रातिनिधिक स्वरूपच आहे.

विनीत हा बेंगळूरु संघाकडून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व करीत असतो. तसेच तो इंडियन सुपरलीगमध्ये केरळ ब्लास्टर्स संघाकडूनही खेळतो. २०१२ पासून शासनाच्या खेळाडूंना नोकरी देण्याच्या योजनेद्वारे त्याला केरळ लेखापाल विभागात नोकरी मिळाली आहे. आक्रमक फळीतील भरवशाचा खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. नुकत्याच झालेल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय स्पर्धेत बेंगळूरु संघाने अंतिम फेरीत मोहन बागानसारख्या तुल्यबळ संघावर अलाहिदा वेळेत २-० असा रोमहर्षक विजय नोंदविला. त्याचे श्रेय विनीत याच्याकडेच जाते. त्याने हे दोन्ही गोल करीत संघास सनसनाटी विजेतेपद मिळवून दिले.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले
is it wrong to expect rich husband
‘श्रीमंत नवरा पाहिजे’, अशी अपेक्षा महिलांनी जोडीदाराकडून ठेवणे चुकीचे आहे का?
Ambati Rayudu explains why RCB didn't win a IPL trophy for 16 years
आरसीबीच्या खराब कामगिरीसाठी अंबाती रायुडूने वरिष्ठ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, “जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा…’

खेळाडूंना शासकीय कोटय़ातून जेव्हा नोकरी दिली जात असते, तेव्हा या खेळाडूंनी तेथे काम करणे अपेक्षित नसते. वेळेची बंधने, रजा याबाबत त्यांच्यावर बंधने घालणेही अपेक्षित नसते. मात्र अनेक वेळा असे दिसते, की खेळाडूंना नोकरी दिली जाते म्हणजे त्यांच्यावर उपकारच केले आहेत अशा भावनेतून त्यांच्या कार्यालयातील अन्य सहकारी वागत असतात. त्यांचे वरिष्ठही त्यास अपवाद नसतात. दुसऱ्या होतकरू उमेदवाराची जागा त्याने अडविली आहे अशाच दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिले जात असते. आपण त्याला फुकट पोसत आहोत अशाही प्रतिक्रिया त्याच्या सहकाऱ्यांकडून ऐकावयास मिळत असतात. परिणामी, भीक नको पण कुत्रे आवर असेच या खेळाडूंना वाटू लागते. कोणत्याही खेळाडूला झटपट यश मिळत नसते. सांघिक खेळांचा विचार केला तर महिनोन्महिने या खेळाडूंना सराव करावा लागतो. दररोज किमान सहा ते आठ तास त्यांना स्पर्धात्मक सराव, पूरक व्यायाम व मानसिक तंदुरुस्ती यावर खर्च करावे लागतात. अधिकाधिक स्पर्धामध्ये भाग घेतल्याखेरीज यश मिळत नसते. अजूनही आपल्याकडे सर्वच ठिकाणी विद्युतप्रकाश व्यवस्था, आधुनिक दर्जाचे मैदान, व्यायामासाठी पूरक सुविधा आदी जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतीलच अशी खात्री देता येत नसते. तसेच आपल्याकडे इतके विभिन्न हवामान असते, की काही वेळा खेळाडूंना अन्य ठिकाणी किंवा परदेशात जाऊन सराव करावा लागतो. अशा सरावामुळे खेळाडूंना अनेक महिने नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात जाणे शक्य नसते. विनीत याच्याबाबत असेच घडले. त्याला बऱ्याच कालावधीत नोकरीवर जाता आले नाही. त्यामुळे त्याला नोकरीतून काढण्यात आले. आर्थिकदृष्टय़ा बेताची परिस्थिती असलेल्या घरातून त्याची कारकीर्द घडली. त्यामुळेच नोकरी गमवावी लागणे ही त्याच्यासाठी अत्यंत दु:खद गोष्ट आहे. तो ज्या कार्यालयात नोकरी करतो, ते कार्यालय केंद्र शासनाच्या अखत्यारीतील विभागाखाली येते. त्याला नोकरीतून काढण्यात आल्याचे प्रकरण आता थेट केंद्रीय क्रीडामंत्र्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे त्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. खेळाडूंना अर्थार्जनाची हमी मिळेल, त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल यासाठी केंद्र शासनाच्या भरपूर योजना आहेत. मात्र अनेक वेळा नोकरशाहीमधील समन्वय व इच्छाशक्तीच्या अभावी अनेक योजना असफल होतात व योजनांमागील हेतू साध्य होत नाही हाच अनुभव आहे.

विनीत याच्यासारख्या अनेक खेळाडूंना अशाच प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खेळातील कारकीर्द सोडायची तर त्यासारखे दु:ख नाही. नोकरी सोडायची तर जगायचे कसे हा त्यांच्यापुढे आणखीनच गंभीर प्रश्न उभा राहतो. खरं तर खेळाडू हे देशाचे सदिच्छादूत मानले जात असतात. ते आपल्याकडे आहेत ही भूषणावह गोष्ट मानून व आपल्या कुटुंबातील तो एक सदस्य आहे असे मानून त्यांनी या खेळाडूंना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. असे झाले तर सर्वच खेळाडूंना खेळात समर्थपणे व आत्मविश्वासाने कारकीर्द करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com