बहारिन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत ‘न भूतो’ कामगिरी साकारली असली तरी सहारा फोर्स इंडियाचे लक्ष आता चीनमध्येही चांगली कामगिरी करण्याकडे लागले आहे. कारच्या कामगिरीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्यामुळे या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे ध्येय फोर्स इंडियाने बाळगले आहे.
बहारिन शर्यतीत सर्जीओ पेरेझने पहिल्यांदाच तिसऱ्यांदा येण्याचा मान पटकावला. निको हल्केनबर्गने पाचवे स्थान पटकावल्यामुळे कंस्ट्रक्टर्स (सांघिक) अजिंक्यपद शर्यतीत फोर्स इंडियाने दुसऱ्या स्थानावर मजल मारली. संघाचे मालक विजय मल्ल्या म्हणाले की, ‘‘या मोसमात आमची कार स्पर्धात्मक असेल, हे आम्ही पहिल्या काही शर्यतींमध्ये दाखवून दिले आहे. प्रत्येक शर्यतीगणिक आमची कामगिरी सुधारत आहे. या मोसमात सुरेख सुरुवात केल्यामुळे मी समाधानी आहे. यापुढेही कामगिरीत सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पुन्हा पोडियमवर स्थान मिळवण्याचे आमचे ध्येय आहे.’’
चांगली कामगिरी करण्याची आशा असली तरी कोणत्याही प्रतिस्पध्र्याला सहजपणे घेणार नाही, असे पेरेझचे म्हणणे आहे. ‘‘अनेक शर्यतींत पोडियमवर स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. बहारिन शर्यतीनंतर माझ्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे, असे वाटते,’’ असे त्याने सांगितले.