भारताच्या जी. साथीयनने सातत्यपूर्ण कामगिरी करत विश्व टेबल टेनिस अजिंक्यपद स्पध्रेत पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत धडक मारली. साथीयनने पात्रता फेरीच्या अंतिम लढतीत चिलीच्या फेलीप ओलिव्हरेसचा ११-७, ११-८, ११-८, ११-४ असा पराभव करून मुख्य फेरीतील जागा निश्चित केली. मात्र, मुख्य फेरीच्या पहिल्याच लढतीत त्याच्यासमोर स्वीडनच्या गेरेल पार याचे कडवे आव्हान असणार आहे.
दुसरीकडे भारताचा सनील शेट्टी याला पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्याला स्वित्र्झलडच्या एलिआ श्युमीडने १२-१०, १३-१५, ११-९, ६-११, ११-७, १३-१५, ९-११ असे पराभूत केले. भारताचा अव्वल मानांकित खेळाडू अचंता शरथ कमल याला पहिल्याच सामन्यात नॉर्थ कोरियाच्या पार्क सीन हृाूचा सामना करावा लागणार आहे.
महिला विभागात माऊमा दासला पहिल्याच सामन्यात रशियाच्या मिखाइलोव्हा पोलिनाचा, तर पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश करणाऱ्या के. शामिनीला लिथूनियाच्या रुटा पास्काउकिएनेचा सामना करावा लागेल. मनिका बत्रासमोर जपानच्या हिराओ मिऊचे आव्हान असेल.
पुरुष दुहेरीत शरथ कमल आणि साथीयन, सौम्यजित घोष आणि सनील शेट्टी यांच्यावर मदार असेल, तर महिला दुहेरीत माऊमा आणि शामिनी एकत्र खेळतील. बत्रा ऑस्ट्रेलियाच्या लेय जिआन फँग हिच्यासह खेळणार आहे.