ब्राझीलमध्ये गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या फुटबॉलच्या महाकुंभ मेळ्यात अगदी पहिल्या सामन्यापासून आपले विजयी ‘हौसले बुलंद’ ठेवणाऱ्या जर्मनीने अर्जेंटिनावर १-० ने मात करत विश्वचषक उंचावला आणि संपूर्ण स्डेडियमवर जर्मन जल्लोष सुरू झाला.
जर्मनीने तब्बल २४ वर्षांनंतर विश्वचषकावर चौथ्यांदा आपले नाव कोरण्याची किमया साधली. विश्वचषकाचा हा अंतिम सामनाही तितकाच रोमांचक झाला होता. प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाने जर्मन संघला अखेरपर्यंत कडवी टक्कर दिली. गुणवत्ता, खेळी आणि समन्वय याबाबतीत एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या जर्मनी आणि अर्जेंटिना यांच्यातील लढत देखील तितकीच रंजक झाली. सामन्याचा नियोजित ९० मिनिटांचा खेळ संपेपर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. अखेर अतिरिक्त वेळेपर्यंत सामना लांबला गेला. त्यात देखील सामना बरोबरीतच सुटून पेनल्टी शुटआऊटच्या दिशेने वाटचाल करण्याच्या तयारीत असातानाच ११३ व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानामध्ये आलेल्या मारिओ गोट्झेने शानदार गोल करत अर्जेंटिनाला धक्का दिला. या गोलवर लिओनल मेस्सीसह संपूर्ण संघच सुन्न झाला. मेस्सीनेही सामन्यात आपल्या सर्वांगसुंदर खेळीने गोल करण्याचा प्रयत्न केला परंतु, जर्मन बचावापुढे त्याचा काही निभाव लागला नाही आणि तब्बल २९ वर्षांनंतर विश्वचषकाचा मानकरी होण्याचे अर्जेंटिनाचे स्वप्न भंगले. सामन्यात बचाव, मध्यरक्षण, आक्रमण आणि गोलरक्षण या चारही बाजू दोन्ही संघांनी लिलया पेलल्या होत्या पण, अखेरच्या क्षणी जर्मनीने बाजी मारत विश्वचषकावर कब्जा केला. या विजयाबरोबर अमेरिकन खंडावर आज पर्यंत खेळल्यागेलेल्या विश्वचषकांमध्ये जर्मनी हा पहिला विश्वविजेता युरोपीय संघ ठरला आहे.  
सामनावीर- मारिओ गोट्झे(जर्मनी)
गोल्डन बॉल- लिओनल मेस्सी (अर्जेंटिना)
गोल्डन बूट- जेम्स रॉड्रिगेझ (कोलंबिया), स्पर्धेत एकूण ६ गोल
गोल्डन ग्लोव (सर्वोत्कृष्ट गोलरक्षक)- मॅन्यूएल न्यअर (जर्मनी)
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू- पौल पोग्बा (फ्रांन्स)
फेअर प्ले- कोलंबिया संघ


(छाया स्त्रोत: एपी)