क्रिकेटच्या मैदानात दिवसेंदिवस नवे विक्रम रचले जाताना दिसतात. एखाद्या विक्रमाची नोंद झाली की तो मोडीस निघणं अशक्य असं सध्या काहीच राहिलेलं नाही. दिग्गज क्रिकेटपटूंकडून विक्रम रचले जातात आणि ते पुढील पिढीच्या खेळाडूंकडून मोडलेही जातात. पाकिस्तानचा माजी फलंदाज सईद अनवर याच्या नावावर वनडेतील १९४ धावांच्या सर्वाधिक वैयक्तिक खेळीच्या विक्रमाची नोंद होती. १९९७ साली अनवरने भारताविरोधात सर्वाधिक धावांची खेळी साकारली होती. अनवरचा हा विक्रम तब्बल १४ वर्षांपर्यंत कोणीच मोडू शकलं नाही. पण मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१० साली या विक्रमालाही ठेंगणं पाडलं. सचिनने द.आफ्रिकेविरुद्ध वनडेत द्विशतकी खेळी साकारली.

सचिनने अनवरचा विक्रम मोडीत काढलाच पण तो वनडे विश्वात द्विशतकी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला. पुढे वीरेंद्र सेहवागनेही द्विशतकी खेळी साकारली. रोहित शर्माने तर त्याही पुढचं पाऊल टाकून वनडेत दोनवेळा द्विशतकी खेळी साकारण्याचा पराक्रम केला.
आता आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. पण हा विक्रम आंतरराष्ट्रीय सामन्यात केला गेलेला नाहीय. एखादा युवा खेळाडू ४० षटकांच्या सामन्यात त्रिशतकी कामगिरी करू शकतो असा विचार तुम्ही कधी केलाय का? नसेल तर तुम्हाला आता विश्वास ठेवावाच लागेल. कारण गाझियाबादमध्ये एका क्लब क्रिकेटकडून खेळणाऱ्या युवा फलंदाजाने ४० षटकांच्या सामन्यात त्रिशतकी कामगिरीचा पराक्रम केला आहे.

 

गाझियाबादच्या अटोर गावाच्या १२ वर्षीय स्वस्तिक चिकाराने ४० षटकांच्या सामन्यातच तब्बल ३५६ धावांची तुफान खेळीची नोंद केली आहे. अर्थात स्वस्तिकने केलेल्या कामगिरीची तुलना आंतरराष्ट्रीय सामन्यात सचिन, सेहवागच्या विक्रमाशी होणं शक्य नाही. पण एखाद्या क्रिकेटपटूला त्रिशतकी कामगिरी करणं हे त्याच्यासाठी खूप मोठं यश आहे.

स्वस्तिकच्या ३५६ धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर आरसीव्ही संघानं आरपी पानीपत संघावर २५२ धावांनी मात केली. स्वस्तिकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून आपले मनसुबे दाखवून दिले होते. दुसऱ्या बाजूनं विकेट पडत असल्या तरी स्वस्तिकने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने १३८ चेंडूचा सामना करत तब्बल २२ षटकारांच्या जोरावर ३५६ धावा कुटल्या. स्वस्तिकच्या स्फोटक खेळीच्या जोरावर संघाने ४५२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आरपी पानीपत संघाचा डाव ३७.२ षटकांत २०० धावांतच गारद झाला. इतकचं नाही, तर स्वस्तिक गोलंदाजीतही आपली कमाल दाखवली. प्रतिस्पर्धी संघाच्या दोन फलंदाजांना त्याने मागे धाडलं.