रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय नेमबाजांची तयारी सुरू झाली आहे. ऑलिम्पिकवारीसाठी उत्सुक नेमबाज मानवजीत सिंग संधूने नुकत्याच झालेल्या नेमबाजी विश्वचषकात ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. या सुवर्णपदकाने ऑलिम्पिकसाठी योग्य मार्गावर असल्याची ग्वाही मिळाल्याचे मानवजीत सिंग संधूने सांगितले. दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेता मायकेल डायमंडला नमवत मानवजीतने सुवर्णपदकाची कमाई केली.
‘‘या यशाने माझे तंत्र, डावपेच आणि उपकरणे सर्व काही सुस्थितीत असल्याची हमी दिली आहे. या कामगिरीत सातत्य राखणे माझ्यासाठी अत्यावश्यक आहे. आणखी जिद्दीने सराव करत सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील आहे,’’ असे मानवजीतने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘यंदा राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या महत्त्वपूर्ण स्पर्धासाठी योग्य सरावानिशी सज्ज राहणे आवश्यक आहे. विश्वचषकातील पदकाने या निर्णायक वर्षांत माझ्यातील कौशल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या १४ महिन्यांत उपकरणे आणि डावपेचांत मी काही बदल केले होते. सुवर्णपदक हे या प्रयत्नांना मिळालेले सकारात्मक यश आहे. गेल्या वर्षी महत्त्वाच्या स्पर्धामध्ये चांगल्या गुणांनंतरही पदकाने मला हुलकावणी दिली. यावर्षी दमदार सुरुवात करण्यासाठी मी आतुर होतो आणि पदकामुळे सुदैवाने तसेच झाले.’’
अंतिम लढतीबाबत मानवजीतने सांगितले, ‘‘ऑलिम्पिक पदकविजेत्या खेळाडूला नमवणे सोपे नव्हते. डायमंडसारख्या मातब्बर नेमबाजावर विजय मिळवणे महत्त्वाचे आहे.’’