रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा
* आजपासून मुंबई-पंजाब रणजी सामना
* हरभजन आणि अजिंक्य संघात दाखल

दुखापतीतून सावरल्यावर संघात दाखल झालेला कर्णधार अजित आगरकर, अजिंक्य रहाणेचे पुनरागमन आणि संघात दुरुस्ती केलेल्या मुंबईच्या संघासमोर वानखेडेवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या रणजी सामन्यात आव्हान असेल ते अव्वल क्रमांकावर असलेल्या पंजाबचे. ‘अ’ गटामध्ये पंजाबने चार विजय मिळवत तब्बल १९ गुणांची कमाई केली आहे, तर मुंबईचे १० गुण आहेत. त्यामुळे गुणांच्या जोरावर पंजाबच्या संघाचे पारडे जड दिसत असले तरी घरच्या मैदानावर मुंबईचा संघ दादा असून त्यांच्याकडे पंजाबला धक्का देण्याची कुवत नक्कीच आहे. पण एकंदरीत पाहता मुंबईसाठी पंजाबचा पेपर नक्कीच कठीण असेल. मुंबईच्या संघात जसे अजिंक्यचे पुनरागमन झाले आहे, तसेच पंजाबच्या संघात हरभजन सिंग परतला असून या दोघांपुढेही चमकदार कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचे ध्येय असेल.
अजिंक्य रहाणे, अजित आगरकर यांच्या संघात येण्याने संघात काही बदल व्यवस्थापनाला करणे भाग आहेत. संघात पुनरागमन करणाऱ्या या दोघांच्या कामगिरीकडे साऱ्यांचेच लक्ष असेल. मुंबईच्या फलंदाजीमध्ये सातत्य आणि गोलंदाजीमध्ये धार पाहायला मिळालेली नाही. बंगालविरुद्धच्या सामन्यात मुंबईची बोथट गोलंदाजी साऱ्यांनीच पाहिलेली आहे. गोलंदाजीमध्ये अनुभवी रमेश पोवारला अजूनही छाप पाडता आलेली नाही. वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीच्या कामगिरीकडे साऱ्यांचेच लक्ष असेल. हिकेन शाह आणि अष्टपैलू अभिषेक नायर यांच्या कामगिरीमध्ये सातत्य पाहायला मिळाले आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावलेल्या असतील. पंजाबच्या संघात हरभजनला राहुल शर्मा आणि बिपुल शर्मा यांची साथ लाभेल, तर वेगवान गोलंदाजीची धुरा संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल आणि मनप्रीत गोणी यांच्यावर असेल. फलंदाजीमध्ये जीवनज्योत सिंग, उदय कौल आणि करण गोयल चांगल्या फॉर्मात आहेत.
दोन्ही संघांच्या कामगिरीचा आणि फॉर्मचा विचार करता मुंबईपेक्षा पंजाबचे पारडे नक्कीच जड आहे. त्यामुळे मुंबईने या सामन्यात पहिल्या डावाच्या आघाडीसह तीन गुण कमावले तरी तो त्यांच्यासाठी विजयासमानच असेल. दुसरीकडे पंजाबचा संघ मोसमातील पाचव्या विजयाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच मैदानात उतरेल.