श्रीलंकन क्रिकेट आयसीसी चौकशीच्या फेऱ्यात

श्रीलंकेच्या क्रिकेटमधील गैरप्रकाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चौकशी सुरू केली आहे. मात्र श्रीलंकेचा समावेश असलेली कोणतीही विशिष्ट क्रिकेट मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाही.

आयसीसीच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या निमित्ताने नुकताच श्रीलंकेचा दौरा केला, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. आयसीसी या विभागाचे महाव्यवस्थापक अ‍ॅलेक्स मार्शल म्हणाले, ‘‘क्रिकेटमधील गैरप्रकारांचा समूळ नायनाट करण्यासाठी आमचा विभाग कार्यरत असतो. याच कारणास्तव ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.’’  श्रीलंकेने मायदेशात झालेली झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय मालिका २-३ अशा फरकाने गमावली होती. त्यानंतर भारताविरुद्धच्या मालिकेत सपाटून मार खाल्ला होता. तीन कसोटी सामन्यांची मालिका, पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामना श्रीलंकेने गमावला होता.

माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती सदस्य प्रमोद्या विक्रमसिंघे यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळाने ४० करारबद्ध खेळाडूंची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयसीसीने आपल्या चौकशीचे स्पष्टीकरण दिले.

‘‘आयसीसीच्या लाचलुचपत विभागाच्या चौकशीअंतर्गत अनेक व्यक्तींची चौकशी होईल. सध्या तरी याबाबत कोणतीही माहिती देता येणार नाही,’’ असे मार्शल यांनी सांगितले. श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीचे त्रिसदस्यीय शिष्टमंडळ या चौकशीसाठी येथे आले आहेत.

येत्या आठवडय़ात श्रीलंकेचा संघ पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीला जाणार आहे. त्याआधी लाचलुचपत विभागाचे पथक त्यांची भेट घेईल.

४६ वर्षीय माजी वेगवान गोलंदाज विक्रमसिंघे यांनी ४० कसोटी आणि १३४ एकदिवसीय सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले असून, एका स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीला मुलाखत देताना श्रीलंकेत सामन्याची आणि खेळाडूंची निवड पद्धती अयोग्य आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर विक्रमसिंघे यांनी म्हटले की, ‘‘कोणत्याही खेळाडूला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. या प्रकरणाची योग्य रीतीने चौकशी व्हावी, हाच माझा हेतू होता.’’

श्रीलंकन क्रिकेट मंडळाने हे आरोप फेटाळताना आपल्या पत्रकात म्हटले आहे की, विक्रमसिंघे यांचे आरोप पूर्णत: बिनबुडाचे आहेत. खेळाडूंनीही मंडळाकडे चौकशीची मागणी केली आहे. मात्र मंडळाने चौकशी संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. २०११ मध्ये मुंबईत झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्यात भारताकडून पराभूत झालेल्या श्रीलंकेच्या संघाची चौकशी करण्याची मागणी जुल महिन्यात श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी केली होती.