* बेलच्या नाबाद शतकी खेळीमुळे इंग्लंडचा सहज विजय
* इयान बेल सामनावीर तर सुरेश रैना मालिकावीर
गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये भारतीय फलंदाजीची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती, पण इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय फलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली.  पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी गडगडली आणि मालिकेचा शेवट गोड करण्यात भारताला अपयश आले. खराब फलंदाजीचा फटका भारताला बसला, पण इयान बेलच्या नाबाद शतकी खेळीमुळे इंग्लंडने भारतावर सात विकेट्सनी विजय साकारला.
भारताची आघाडीची फळी पूर्णपणे कोलमडल्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या या स्टेडियमवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीला पूर्णपणे वर्चस्व गाजवले. गोलंदाजीला साथ मिळणाऱ्या या खेळपट्टीवर टिम ब्रेस्ननने भारताच्या डावाला सुरुंग लावत चार बळी मिळवले. पण दडपणाखाली सुरेश रैनाने साकारलेले शानदार अर्धशतक आणि त्याला मिळालेली रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमारची साथ यामुळे भारताने २०० धावांचा टप्पा गाठला. भारताचे २२७ धावांचे आव्हान पेलताना इंग्लंडने कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक (२२) आणि केव्हिन पीटरसन (६) हे भरवशाचे फलंदाज स्वस्तात गमावले. पण बेलने कारकीर्दीतील तिसरे शतक झळकावत जो रूट आणि इऑन मॉर्गन यांच्या साथीने इंग्लंडला १६ चेंडू राखून सहज विजय मिळवून दिला. मोहालीतील चौथी लढत जिंकून भारताने ही मालिका आधीच जिंकली होती. पण इंग्लंडने अखेरचा सामना जिंकून ही मालिका ३-२ अशी सोडवली. नाबाद ११३ धावांची खेळी करणारा इयान बेल सामनावीर, तर सुरेश रैना मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारताच्या एकाही फलंदाजाचा निभाव लागला नाही. गौतम गंभीर (२४), रोहित शर्मा (४), विराट कोहली (०), युवराज सिंग (०) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (१५) हे भारताचे अव्वल फलंदाज एकापाठोपाठ माघारी परतले. खराब फटक्यांची निवड यामुळे भारताची २२व्या षटकांत ५ बाद ७९ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण सुरेश रैनाने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने ९८ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह ८३ धावांची खेळी साकारली. जडेजाने ३९, तर भुवनेश्वरने ३१ धावा फटकावल्यामुळे भारताचा डाव २२६ धावांवर संपुष्टात आला.
इंग्लंडसाठी हे आव्हान सोपे नक्कीच नव्हते. पण कुक आणि बेल यांनी सुरेख सुरुवात करत सलामीसाठी ५३ धावा जोडल्या. त्यानंतर बेल आणि रूट यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचत इंग्लंडला विजयाच्या जवळ आणून ठेवले. त्यानंतर बेल आणि मॉर्गन यांनी चौथ्या विकेटसाठी ८४ धावांची अभेद्य भागी रचून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मॉर्गनने तीन षटकारांची आतषबाजी करत नाबाद ४० धावा केल्या.
नाणेफेक जिंकणे केव्हाही महत्त्वाचे -कुक
नाणेफेक जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे ठरले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या चार फलंदाजांना अवघ्या ४९ धावांत माघारी पाठवल्यामुळे आम्हीच विजय मिळवू, हे जवळपास पक्के झाले होते. इयान बेलनेही सुरेख फलंदाजी करत शानदार शतक साजरे केले. हा सामना इंग्लंडने सहज जिंकला तरी मालिका गमावल्यामुळे आम्ही निराश झालो आहोत. मालिकेचा शेवट चांगला करता आला तरी लागोपाठ तीन सामने गमावल्यामुळे आम्हाला मालिकेवर पाणी सोडावे लागले. पण तरीही इंग्लंडच्या खेळाडूंनी सांघिक कामगिरीचे प्रदर्शन घडवले.

धोनीने केली गंभीर, अश्विनची पाठराखण
गंभीर सध्या खराब फॉर्मात असला तरी तो संघातील अनुभवी खेळाडू आहे. यापुढे तो आपल्या कामगिरीत सुधारणा करेल, अशी आशा आहे. त्याने ३५-४० षटकापर्यंत खेळावे, अशी आमची इच्छा आहे. अश्विन गोलंदाजीत विविधता आणण्याचा जास्त प्रयत्न करत आहे. पण त्याला आपली चूक उमगली आहे. या मालिकेत इशांत शर्माने सुरेख गोलंदाजी केली. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार आणि शमी अहमद हे युवा गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. पण त्यांना सध्या कसोटी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या विचारात नाही.
धावफलक
भारत : गौतम गंभीर झे. बेल गो. ट्रेडवेल २४, रोहित शर्मा झे. ट्रेडवेल गो. ब्रेस्नन ४, विराट कोहली झे. ट्रेडवेल गो. ब्रेस्नन ०, युवराज सिंग झे. मॉर्गन गो. फिन ०, सुरेश रैना झे. बेल गो. वोक्स ८३, महेंद्रसिंग धोनी पायचीत गो. फिन १५, रवींद्र जडेजा झे. बेल गो. ट्रेडवेल ३९, रविचंद्रन अश्विन झे. फिन गो. पटेल १९, भुवनेश्वर कुमार झे. फिन गो. ब्रेस्नन ३१, शमी अहमद झे. आणि गो. ब्रेस्नन १, इशांत शर्मा नाबाद ०, अवांतर (लेगबाइज-४, वाइड-६) १०, एकूण : ४९.४ षटकांत सर्व बाद २२६.
बाद क्रम : १-१३, २-१३, ३-२४, ४-४९, ५-७९, ६-१५७, ७-१७७, ८-२११, ९-२२५, १०-२२६.
गोलंदाजी : स्टीव्हन फिन १०-२-२७-२, टिम ब्रेस्नन ९.४-१-४५-४, ख्रिस वोक्स ९-१-४५-१, जेम्स ट्रेडवेल १०-१-२५-२, जो रूट ५-०-३४-०, समित पटेल ६-०-४६-१.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक त्रि. गो. इशांत २२, इयान बेल नाबाद ११३, केव्हिन पीटरसन झे. जडेजा गो. अहमद ६, जो रूट त्रि. गो. जडेजा ३१, इऑन मॉर्गन नाबाद ४०, अवांतर (लेगबाइज-८, वाइड-७) १५, एकूण : ४७.२ षटकांत ३ बाद २२७.
बाद क्रम : १-५३, २-६४, ३-१४३.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ९-१-४५-०, शमी अहमद ९-१-४६-१, इशांत शर्मा १०-३-३७-१, रविचंद्रन अश्विन १०-०-५०-०, युवराज सिंग २-०-१५-०, रवींद्र जडेजा ७.२-०-२६-१.