पहिल्या सामन्यात दहा खेळाडूंसह खेळतानाही भारताने पाकिस्तानविरुद्ध फुटबॉलच्या पहिल्या प्रदर्शनीय सामन्यात विजय मिळविला होता. हीच विजयी मालिका राखण्यासाठी भारतीय संघ बुधवारी येथील लढतीत प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे.
दुसऱ्या लढतीसाठी भारताचे पारडे जड मानले जात आहे. पहिल्या लढतीत भारताच्या २३ वर्षांखालील खेळाडूंनी चिवट झुंज देत १-० असा विजय मिळविला होता. त्यांचा हा एकमेव गोल रॉबिनसिंग याने केला होता. त्यानंतर धसमुसळ्या खेळामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते.
भारतीय संघाचे प्रशिक्षक विम कोव्हरमन्स यांनी दुसऱ्या लढतीबाबत आत्मविश्वास व्यक्त करीत सांगितले, पहिल्या लढतीमधील विजयामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. पाकिस्तानचा संघ बलाढय़ असल्यामुळे आम्ही अतिशय गांभीर्यानेच या लढतीकडे पाहत आहोत. त्यांच्या वेगवान चालींना आम्ही जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठीच व्यूहरचना करणार आहोत. आमचा संघ अतिशय समतोल आहे. धारदार आक्रमणाबरोबरच भक्कम बचाव करण्याबाबतही आमचे खेळाडू तरबेज आहेत.
पाकिस्तानचे प्रशिक्षक महंमद शमलान अल मुबारक यांनी सांगितले, दोन सामन्यांची मालिका बरोबरीत राखण्यासाठीच आम्ही खेळणार आहोत. भारतास पराभूत करण्याची आमच्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे. पहिल्या सामन्यात दडपणखाली आमच्या खेळाडूंना अपेक्षेइतकी चांगली कामगिरी करता आली नाही.
भारतीय संघातील खेळाडू काही वेळा बचावफळीत अक्षम्य चुका करतात व त्याचाच फायदा घेण्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू प्रयत्न करतील असा अंदाज आहे. कर्णधार सुनील छेत्री याच्यावर भारताच्या आक्रमणाची मदार आहे. त्याला अमरिंदरसिंग, संदेश झिंगा, जॉयनर मोन्टे लॉरेन्स, शंकर संपागीराग, मंदार देसाई, सेमीनीलेन डौंगेल यांची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. बचाव फळीत प्रणय हलदर याच्यावर भारताची भिस्त आहे.
पाकिस्तानला कलीमुल्ला, महंमद आदिल यांच्याकडून जोरदार आक्रमणाची अपेक्षा आहे. कलीमुल्ला याला नुकतेच किर्गिझस्तानमधील दोदरेई बिश्केक क्लबने करारबद्ध केले आहे. मधल्या फळीत सद्दाम हुसेनी याच्यावरही पाकिस्तानची मदार आहे.