मोझेस हेन्रिक्स-नॅथन लिऑन दहाव्या विकेटसाठी नाबाद ५७ धावांची भागीदारी

भारत विजयाच्या द्वारापाशी येऊन ठेपला आहे. फक्त या दरवाजापाशी मोझेस हेन्रिक्स नामक अडसर दरवाजा अडवून समर्थपणे उभा आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी विजयासाठी भारतीय क्रिकेटरसिकांना पाचव्या दिवसापर्यंतचा विलंब सहन करावा लागणार आहे. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या हेन्रिक्सने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही जिद्दीने किल्ला लढविला. भारत आणि विजय यांच्यात अडथळ्याप्रमाणे उभ्या राहणाऱ्या हेन्रिक्सची नाबाद ७५ धावांची झुंजार खेळी ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी वस्तुपाठ ठरली.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव लवकर गुंडाळून सोमवारी चौथ्या दिवशीच विजय साजरा करण्याचे मनसुबे भारतीय संघाने आखले होते, पण भारतीय फिरकीसमोर नतमस्तक होणे हेन्रिक्सला मुळीच मंजूर नव्हते. तो तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन लढला. ११व्या क्रमांकावरील फलंदाज नॅथन लिऑनसोबत त्याने १०व्या विकेटसाठी नाबाद ५७ धावांची भागीदारी रचली. यातील लिऑनचा वाटा आहे तो फक्त ८ धावांचा. या दोघांनी भारतीय त्रिकुटाचा समर्थपणे सामना करीत १८.१ षटके खेळपट्टीवर ठाण मांडले. हेन्रिक्सने १२४ चेंडूंत सहा चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांनिशी आपली खेळी साकारली. पोर्तुगालमध्ये जन्मलेल्या अष्टपैलू हेन्रिक्सने आपल्या लाजवाब पदलालित्याच्या बळावर भारतीय फिरकीचा मुकाबला केला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर ४० धावांची आघाडी जमा आहे.
सोमवारी ऑफ-स्पिनर अश्विनने या कसोटीत दुसऱ्यांदा पाच बळी घेण्याची किमया साधताना ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या आणि मधल्या फळीला हादरे दिले. अश्विनने दुसऱ्या डावात ९० धावांत ५ बळी घेतले असून, आता या सामन्यात त्याच्या खात्यावर १२ बळी जमा आहेत. त्यामुळेच हेन्रिक्स-लिऑन यांनी तारण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात ९ बाद १७५ अशी दैना उडाली होती.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात भारताने आणखी ५७ धावांची भर घालत पहिल्या डावात ५७२ अशी अवघड धावसंख्या उभी केली. कप्तान महेंद्रसिंग धोनीने साकारलेल्या २२४ धावांच्या खेळीने या धावसंख्येत सिंहाचा वाटा उचलला.  त्याच बळावर भारताला पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी मिळाली. मग फिरकीच्या पूर्णपणे अधीन झालेल्या चेपॉकच्या खेळपट्टीवर अश्विनप्रमाणेच अनुभवी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगनेही टिच्चून गोलंदाजी करीत डेव्हिड वॉर्नर आणि मॅथ्यू वेड यांचे महत्त्वाचे बळी मिळवले. डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजानेही दोन बळी घेतले.
प्रत्येक षटकागणिक फिरकी आणि उसळीला अधिकाधिक साथ देणाऱ्या चेपॉकवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दुसऱ्या डावात अक्षरश: अग्निपरीक्षा ठरली. ईडी कोवान (३२), मायकेल क्लार्क (३१) आणि डेव्हिड वॉर्नर (२३) यांनी खेळपट्टीवर तग धरण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले. ही कसोटी वाचविण्यासाठी पाच सत्र ऑस्ट्रेलियाच्या हातात होती. पहिल्याच सत्रात कोवान आणि वॉटसन यांनी चांगले फटके खेळून संघाला आशा दाखवली, परंतु उपाहारापूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. वीरेंद्र सेहवागने स्लिपमध्ये त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात पाहुण्या संघाने चार फलंदाज गमावले आणि सामन्याचे चित्र भारताच्या बाजूने झुकले. अखेरच्या सत्रातही भारताने चार बळी मिळवले, पण हेन्रिक्सने ऑस्ट्रेलियाचा पराभव एक दिवसाने पुढे ढकलला. आता ऑसी संघ ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का?’ हीच आशा फक्त धरू शकतो.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३८०
भारत (पहिला डाव) : मुरली विजय त्रिफळा गो. पॅटिन्सन १०, वीरेंद्र सेहवाग त्रिफळा गो. पॅटिन्सन २, चेतेश्वर पुजारा त्रिफळा गो. पॅटिन्सन ४४, सचिन तेंडुलकर त्रिफळा लिऑन ८१, विराट कोहली झे. स्टार्क गो. लिऑन १०७, महेंद्रसिंग धोनी झे. वेड गो. पॅटिन्सन २२४, रवींद्र जडेजा त्रिफळा गो. पॅटिन्सन १६, आर. अश्विन त्रिफळा गो. लिऑन ३, हरभजन सिंग त्रिफळा गो. हेन्रिक्स ११, भुवनेश्वर कुमार झे. क्लार्क गो. सिडल ३८, इशांत शर्मा नाबाद ४, अवांतर (बाइज १४, लेगबाइज १४, वाइड ४): ३२, एकूण १५४.३ षटकांत सर्व बाद ५७२
बाद क्रम : १-११, २-१२, ३-१०५, ४-१९६, ५-३२४, ६-३६५, ७-३७२, ८-४०६, ९-५४६, १०-५७२.
गोलंदाजी : मिचेल स्टार्क २५-३-७५-०, जेम्स पॅटिन्सन ३०-६-९६-५, पीटर सिडल २४.३-५-६६-१, नॅथन लिऑन ४७-१-२१५-३, मोझेस हेन्रिक्स १७-४-४८-१, मायकेल क्लार्क ८-२-२५-०, डेव्हिड वॉर्नर ३-०-१९-०.
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ईडी कोवन पायचीत गो. अश्विन ३२, शेन वॉटसन झे. सेहवाग गो. अश्विन १७, डेव्हिड वॉर्नर पायचीत गो. हरभजन २३, फिल ह्युजेस झे. सेहवाग गो. जडेजा ०, मायकेल क्लार्क पायचीत गो. अश्विन ३१, मॅथ्यू वेड त्रिफळा गो. हरभजन ८, मोझेस हेन्रिक्स खेळत आहे ७५, पीटर सिडल त्रिफळा गो. जडेजा २, जेम्स पॅटिन्सन झे. सेहवाग गो. अश्विन ११, मिचेल स्टार्क झे. तेंडुलकर गो. अश्विन ८, मॅथ्यू लिऑन खेळत आहे १२, अवांतर (बाइज ११, लेगबाइज २): १३, एकूण ८४ षटकांत ९ बाद २३२
बाद क्रम : १-३४, २-६४, ३-६५, ४-१०१, ५-१२१, ६-१३१, ७-१३७, ८-१६१, ९-१७५
गोलंदाजी : आर. अश्विन २८-४-९०-५, हरभजन सिंग २७-६-५९-२, रवींद्र जडेजा २६-५-६८-२, इशांत शर्मा ३-१-२-०.

जायबंदी जॅक्सन बर्ड  मायदेशी परतणार
चेन्नई : पाठीच्या दुखापतीमुळे जायबंदी झालेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्ड याला उपचारांसाठी मायदेशी परतावे लागणार आहे. ‘बर्डची पाठ दुखत असल्याने त्याला उपचारांसाठी मायदेशी पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जर वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सामान्य असले तर त्याला भारतात पुन्हा संघात बोलवता येईल,’ असे ऑस्ट्रेलियाच्या संघाचे डॉक्टर पीटर ब्रुनेक यांनी सांगितले.

‘‘चेपॉकची खेळपट्टी मला तरी फारशी अडचणीची वाटली नाही, किंबहुना मी खूपच मुक्तपणे या खेळपट्टीवर खेळलो. कर्णधार मायकेल क्लार्कने अशा गोलंदाजीला कसे सामोरे जायचे हे सांगितले आणि मी त्यानुसारच खेळत राहिलो. सामन्यात आमचा पराभव निश्चित असला, तरी आम्ही शेवटपर्यंत झुंज देण्याचे ठरविले आहे.’’
 -मोझेस हेन्रिक्स, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू

‘‘ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दुसऱ्या डावात घसरगुंडी उडविण्याचे श्रेय संघातील सर्वाचेच आहे. इंग्लंडने भारताविरुद्ध कसोटीत अव्वल यश मिळविले होते, त्याप्रमाणेच आपणही यश मिळवू अशा भ्रमात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू होते. त्यांनी फिरकी गोलंदाजीपुढे सकारात्मक खेळ करताना आक्रमक पवित्रा घेतला. पण आम्ही जबाबदारीने कामगिरी केली. ’’
 -रवींद्र जडेजा, भारताचा अष्टपैलू खेळाडू

चौथ्या दिवसअखेर
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव ) : ३८०
भारत (पहिला डाव ) : ५७२
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव ) : ९ बाद २३२

सत्र    धावा/बळी
पहिले सत्र    ९१/३
दुसरे सत्र    ९४/४
तिसरे सत्र     १०४/४