भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचे सामने नियमित व्हावेत, ही केवळ आमची इच्छा नसून असंख्य चाहत्यांनाही तसेच वाटत आहे, असे पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार मिसबाह उल हक याने सांगितले.
पाकिस्तान व भारत यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला ३० डिसेंबर रोजी चेन्नईत होणाऱ्या पहिल्या सामन्याने प्रारंभ होत आहे. या मालिकेसाठी मिसबाह नेतृत्व करीत आहे. त्याच्याबरोबरच युनूस खान, वहाब रियाद यांच्यासह एकदिवसीय संघातील काही खेळाडू चेन्नईत आधीच दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी भरपूर वेळ सराव केला.
सरावानंतर मिसबाहला पत्रकारांनी गाठल्यावर त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला. दोन संघांमधील सामन्यांविषयी तो म्हणाला, ‘‘भारताबरोबरच्या सामन्यांची फक्त आम्हाला गरज आहे, असे सर्वाना वाटते. मात्र ही कल्पना चुकीची आहे. भारतामधील अनेक चाहत्यांनाही या दोन संघांमधील सामने नियमित व्हावेत असेच वाटते. त्याचा फायदा दोन्ही देशांमधील नवोदित खेळाडूंना मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेत आमच्या खेळाडूंना पुन्हा संधी मिळाली तर या सामन्यांना अधिक प्रेक्षक मिळतील अशी मला खात्री आहे. आमच्या देशातही अशा स्वरूपाचे सामने नियमित आयोजित करण्याबाबत आम्ही आशावादी असून त्यामध्ये बांगलादेश, भारत व श्रीलंका या देशांच्या खेळाडूंचा सहभाग व्हावा.’’
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेविषयी विचारले असता मिसबाह म्हणाला, ‘‘आमच्या संघात अनुभवी व तरुण अशा खेळाडूंचा समतोल साधला गेला आहे. भारतीय संघाला भारतीय मैदानावर पराभूत करणे सोपे नाही. भारतीय संघ विश्वविजेता आहे. अर्थात क्रिकेटमध्ये केव्हाही सामन्याचे पारडे बदलू शकते. वेगवान गोलंदाज ही आमची जमेची बाजू आहे. येथील ढगाळ वातावरण आमच्या गोलंदाजांना पोषक आहे. विश्वचषक स्पर्धेत झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आम्ही पुढच्या विश्वचषक स्पर्धेसाठी आतापासूनच संघ बांधणी करीत आहोत. त्यासाठी भारताबरोबरचे सामने आम्हाला उपयुक्त ठरणार आहेत.’’
सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीचा फायदा तुम्हाला होईल काय, असे विचारले असता मिसबाह म्हणाला, ‘‘सचिनविषयी आम्हा सर्वाना आदर आहे. तो महान खेळाडू आहे, याबाबत शंकाच नाही. मात्र त्याचा समावेश असताना आम्ही भारताविरुद्ध अनेक वेळा विजय मिळविला आहे. अर्थात आता त्याने वनडेतून निवृत्ती स्वीकारली आहे, त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आम्ही या गोष्टीचा फायदा घेण्याचा निश्चितच प्रयत्न करू.’’
सामन्यावर पावसाचे सावट!
चेन्नई परिसरात गेले तीन-चार दिवस हलक्या सरी पडल्या आहेत. गेले आठ दिवस येथे ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सामन्याचे आयोजन करणाऱ्या तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी चिंतेत पडले आहेत. मुख्य खेळपट्टी, सरावासाठी असलेल्या खेळपट्टय़ाही पूर्णपणे आच्छादित ठेवण्यात आल्या आहेत. येथील स्टेडियमची क्षमता ४० हजारच्या आसपास असून, सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.